लोहा नगर परिषद सार्वत्रिक निवडणूकीसाठी आरक्षण सोडत जाहीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2018 06:34 PM2018-08-31T18:34:48+5:302018-08-31T18:37:31+5:30
लोहा नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणूकीसाठीची राज्य निवडणूक आयोगाने ठरवून दिलेल्या आरक्षणाच्या प्रमाणानुसार चिठया काढून सोडत पध्दतीने नगरसेवक पदांचे आरक्षण निश्चित करण्यात आले.
लोहा (नांदेड ) : लोहा नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणूकीसाठीची राज्य निवडणूक आयोगाने ठरवून दिलेल्या आरक्षणाच्या प्रमाणानुसार चिठया काढून सोडत पध्दतीने नगरसेवक पदांचे आरक्षण निश्चित करण्यात आले.
नगर परिषदेचा कालावधी येत्या १७ डिसेंबर रोजी संपुष्टात येत आहे. या अनुषंगाने आज सकाळी ११ वाजता तहसील कार्यालयात आरक्षण सोडत घेण्यात आली. यावेळी कंधारचे उपविभागीय अधिकारी डॉ. सचिन खल्लाळ यांची उपस्थिती होती. नगर परिषदेसाठी निवडून द्यावयाच्या सदस्य संख्या राजपत्रात प्रसिध्द केले आहे. त्यानुसार निवडून द्यावयाच्या १७ सदस्यांपैकी महिलांसाठी ९, अनुसूचित जातीसाठी ३, नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी ५ जागा राखून ठेवण्याची सदस्य संख्या निश्चित केली आहे. त्यापैकी अनुसूचित जाती महिलांसाठी- २, नागरीकांचा मागास प्रवर्ग महिलांसाठी- ३ व सर्वसाधारण महिलांसाठी- ४ अशी राखीव जागांची विभागणी करण्यात आली आहे.
आरक्षण सोडतीनुसार आरक्षण पुढीलप्रमाणे - प्रभाग क्रं. १-अ- सर्वसाधारण महिला, १- ब- नागरिकांचा मागास प्रवर्ग सर्वसाधारण, प्रभाग क्रं. २-अ- सर्वसाधारण महिला, २- ब- अनुसूचित जाती सर्वसाधारण, प्रभाग क्रं. ३- अ- अनुसूचित जाती महिला, ३- ब- सर्वसाधारण, प्रभाग क्रं. ४-अ- अनुसूचित जाती महिला, ४- ब- सर्वसाधारण, प्रभाग क्रं. ५-अ- नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, ५- ब- सर्वसाधारण, प्रभाग क्रं. ६- अ- नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, ६-ब- सर्वसाधारण महिला, ६-क- सर्वसाधारण, प्रभाग क्रं. ७-अ- नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, ७-ब- सर्वसाधारण, प्रभाग क्रं. ८- अ- सर्वसाधारण महिला, ८-ब- नागरिकांचा मागास प्रवर्ग सर्वसाधारण.
या पध्दतीने सदरील आरक्षण सोडत काढण्यात आली. यावेळी लोह्याचे तहसिलदार विठ्ठल परळीकर, न. प. चे मुख्याधिकारी अशोक मोकले, कंधारच्या तहसिलदार संतोषी देवकुळे, जिल्हा प्रशासन अधिकारी रमेश चव्हाण, पो. नि. अभिमन्यू साळुंके, स. पो. नि. वैजनाथ मुंढे, पो. उप. नि. असद शेख, नायब तहसिलदार सारंग चव्हाण, आर.बी. भोगावार, न.प.चे उल्हास राठोड, बी.बी. पवार, सह कर्मचारी उपस्थित होते.