नांदेड जिल्ह्यात शिवसेनेकडून निवडणूक मोर्चेबांधणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2018 12:49 AM2018-05-04T00:49:13+5:302018-05-04T00:49:13+5:30
जिल्ह्यात शिवसेनेचे पाळेमुळे भक्कम आहेत. गावपातळीवर कार्यकर्त्यांचे नेटवर्क असल्याने आगामी निवडणुकांत जिल्ह्यात शिवसेनेला चांगले यश मिळेल, असा विश्वास व्यक्त करीत आगामी निवडणुकांच्या अनुषंगाने १२ तारखेनंतर विधानसभा क्षेत्रनिहाय दौरा करुन पक्षश्रेष्ठींना अहवाल देणार असल्याचे संपर्कप्रमुमुख आनंद जाधव यांनी सांगितले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड : जिल्ह्यात शिवसेनेचे पाळेमुळे भक्कम आहेत. गावपातळीवर कार्यकर्त्यांचे नेटवर्क असल्याने आगामी निवडणुकांत जिल्ह्यात शिवसेनेला चांगले यश मिळेल, असा विश्वास व्यक्त करीत आगामी निवडणुकांच्या अनुषंगाने १२ तारखेनंतर विधानसभा क्षेत्रनिहाय दौरा करुन पक्षश्रेष्ठींना अहवाल देणार असल्याचे संपर्कप्रमुमुख आनंद जाधव यांनी सांगितले.
येथील शासकीय विश्रामगृहावर गुरुवारी दुपारी शिवसेनेची संघटनात्मक बैठक घेण्यात आली. या बैठकीला आ. सुभाष साबणे, जिल्हाप्रमुख भुजंग पाटील, जिल्हाप्रमुख बाबूराव कदम, सहसंपर्कप्रमुख उमेश मुंडे, जिल्हा समन्वयक धोंडू पाटील,नगरसेवक बालाजी कल्याणकर, माजी जिल्हाप्रमुख प्रकाश मारावार, महिला आघाडीच्या निकिता चव्हाण, संगीता बियाणी आदींसह पदाधिकारी, शिवसैनिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. बैठकीनंतर आनंद जाधव यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
येत्या १२ तारखेनंतर विधानसभा क्षेत्रनिहाय वेळ देणार आहे. या दौऱ्यात तालुकाप्रमुखांनी काय काम केले, शेतकरी कर्जमाफीचे किती फॉर्म भरले, तालुक्यात शिवसेनेच्या किती शाखा उभ्या केल्या आदींचा आढावा घेणार असून त्यानंतर विधानभा क्षेत्रनिहाय पक्षश्रेष्ठींना अहवाल देणार असल्याचे ते म्हणाले. जिल्हाप्रमुख पदासाठी अनेकजण इच्छुक आहेत.
ही निवडणूक लवकरच करण्यात येईल, असे सांगत आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमिवर नांदेड जिल्ह्यातील शिवसैनिकांनी कामाला लागावे, असे आवाहन जाधव यांनी केले.