हदगाव कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक घोषित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2018 12:03 AM2018-11-15T00:03:31+5:302018-11-15T00:03:58+5:30
१५ ते २० नोव्हेंबर या कालावधीत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहे तर २२ डिसेंबर रोजी मतदान आणि २३ डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे
नांदेड : हदगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचा निवडणूक कार्यक्रम घोषित झाला आहे. १५ ते २० नोव्हेंबर या कालावधीत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहे तर २२ डिसेंबर रोजी मतदान आणि २३ डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी तथा निवडणूक अधिकारी लहुराज माळी यांनी दिली.
जिल्ह्यातील ३१ डिसेंबर २०१७ अखेर मुदत संपणाऱ्या बाजार समितींच्या निवडणुका घेण्याचे निर्देश राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाचे आयुक्तांनी दिले आहेत. त्यानुसार हदगाव बाजार समितीची निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे. जिल्हाधिकारी माळी यांनी सांगितले, नामनिर्देशनपत्र दाखल करण्याची प्रक्रिया १५ ते २० नोव्हेंबर या कालावधीत हदगाव पंचायत समितीच्या सभागृहात होणार आहे. नामनिर्देशनपत्रांची छाननी २२ नोव्हेंबर रोजी होईल. २६ नोव्हेंबर ते १० डिसेंबर या कालावधीत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी १२ डिसेंबर रोजी मतदान होईल तर २३ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजेपासून मतमोजणीला प्रारंभ होणार आहे. या निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली आहे. मतमोजणी संपेपर्यंत ती लागू राहणार आहे. आचारसंहिता कालावधीत विद्यमान संचालकांना मतदारांना प्रभावित करता येणारे कोणतेही निर्णय घेता येणार नाहीत. बाजार समितीच्या खर्चातून झालेल्या कामाचे उद्घाटन करता येणार नाही.
हदगाव कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी १५ गण शेतकरी गटात असतील. शेतकरी गटातील मतदारसंख्या ५९ हजार ८४९ इतकी आहे. या निवडणुकीत दोन व्यापारी गण आहेत. व्यापारी मतदारांची संख्या ३४९ तर एकमेव हमाल मापाडी गणात १४३ मतदार राहणार आहेत. या निवडणुकीसाठी ६० हजार ३४१ मतदार आपला मतदानाचा हक्क बजावतील. त्यामध्ये ४६ हजार ६६२ पुरुष तर १३ हजार ६७९ स्त्री मतदार आहेत. या निवडणुकीसाठी १८ सदस्य निवडून द्यायचे असून १६१ गावांचा समावेश आहे. त्यापैकी १० गावे हिमायतनगर तालुक्यातील आहेत. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी १०५ मतदान केंद्र निश्चित करण्यात आले आहेत.
शेतकरी मतदारांसाठी गणामधील रहिवासी असलेले शेतकरी ज्यांच्याकडे १० आर. पेक्षा जास्त जमीन आहे. तर जे १८ वर्षे वय पूर्ण करतात, अशा शेतकºयांना मतदानाचा अधिकार राहणार आहे.
हदगाव बाजार समितीच्या निवडणुकीसाठी तहसीलदार संदीप कुलकर्णी यांची निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून तर सहाय्यक निवडणूक अधिकारी म्हणून हदगावचे सहायक निबंधक, सहकारी संस्था ए.जे. भिल्लारे, नायब तहसीलदार जे.डी. हराळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. निरीक्षक म्हणून जि.प.चे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी शरद कुलकर्णी यांची नेमणूक करण्यात आली आहे.
बाजार समितीच्या गणाचे आरक्षण ८ आॅगस्ट रोजी घोषित करण्यात आले आहे. त्यानुसार तळणी गण विमुक्त जाती, भटक्या जमातीसाठी, धानोरा रु. गण- अनुसूचित जाती-जमातीसाठी, कोळी, पळसा गण महिलांसाठी, मांडवा गण इतर मागासवर्गीयांसाठी राखीव राहणार आहे तर शिरड गण, तालंग, हदगाव, हरडफ, तामसा, सावरगाव, चाभरा, पिंपळगाव, आष्टी आणि कांडली (बु) हे गण सर्वसाधारण प्रवर्गासाठी राहणार आहेत.