अशोकरावांसाठी निवडणूक प्रतिष्ठेची; नांदेड जिल्हा ताब्यात ठेवण्यासाठी लागणार कस
By श्रीनिवास भोसले | Published: November 7, 2024 08:16 PM2024-11-07T20:16:38+5:302024-11-07T20:18:47+5:30
प्रतापराव राष्ट्रवादीत गेल्याने आता शिवाजीनगरच सत्ताकेंद्र
- श्रीनिवास भोसले
नांदेड : आजपर्यंतच्या निवडणुकांमध्ये माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्यामुळे नांदेड हा काँग्रेसचा बालेकिल्ला राहिलेला आहे. परंतु, आजघडीला अशोकराव भाजपमध्ये दाखल झाले असून त्यांच्या नेतृत्वात जिल्ह्यातील भाजप पहिल्यांदाच विधानसभेला सामोरी जात आहे. त्यात त्यांची कन्या श्रीजया यांची विधानसभेच्या माध्यमातून राजकारणात एन्ट्री करत आहे. त्यामुळे भोकरसह जिल्ह्यात महायुतीच्या सर्वाधिक जागा निवडून आणणे अशोकरावांसाठी प्रतिष्ठेचा विषय बनला आहे.
दिवंगत नेते शंकरराव चव्हाण यांच्या काळापासून ते अशोकराव चव्हाण यांच्या नेतृत्वात २०२४ पर्यंत नांदेड जिल्ह्यात काँग्रेसची घोडदौड सुरू होती. परंतु, लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर अशोकराव यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे आता काँग्रेसकडे कोणी नेतृत्व उरले नाही. त्यात भाजपमध्ये असलेले माजी खासदार प्रतापराव चिखलीकर यांनी राष्ट्रवादीचे घड्याळ हाताला बांधले. परिणामी स्थानिक भाजपची पूर्ण कमांड अशोकराव चव्हाण यांच्या हाती आली आहे. त्यातून त्यांनी भाजपमध्ये आलेल्या आमदार जितेश अंतापूरकर यांना पक्षाची उमेदवारी मिळवून दिली. भोकरसहदेगलूरची जागा त्यांच्या प्रतिष्ठेची असून उर्वरित भाजपच्या वाट्याला आलेल्या मुखेड, नायगावमध्ये देखील त्यांना लक्ष घालावे लागणार आहे. महायुतीचा धर्म पाळत सर्वाधिक जागा महायुतीच्या निवडून आणण्यासाठी त्यांची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे. अशोकरावांच्या नेतृत्वात नांदेड हा काँग्रेसचा बालेकिल्ला होता. त्यांच्या भाजप प्रवेशाने तो आता भाजपचा झाल्याचे सिद्ध करण्याची ही वेळ आहे.
चार ठिकाणी भाजप विरूद्ध काँग्रेस
नांदेड जिल्ह्यातील नऊ मतदारसंघांपैकी भोकर, मुखेड, नायगाव, देगलूर या चार मतदारसंघात भाजप विरूद्ध काँग्रेस अशी थेट लढत होत आहे. तर किनवटमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गट विरूद्ध भाजप, नांदेड उत्तर आणि दक्षिणमध्ये शिंदे सेना विरूद्ध काँग्रेस आणि लोहामध्ये राष्ट्रवादी अजित पवार गट विरूद्ध उद्धवसेना असा सामना होत आहे.
मुख्यमंत्री असताना जिल्हा झाला होता काँग्रेसमय
अशोकराव चव्हाण मुख्यमंत्री असताना २००९ च्या निवडणुकीत नांदेड जिल्हा काँग्रेसमय झाला होता. त्यावेळी महायुतीचा एकही उमेदवार निवडून आला नव्हता. जिल्ह्यातील नऊपैकी भोकर, हदगाव, नांदेड उत्तर, नांदेड दक्षिण, देगलूर, मुखेड या सहा ठिकाणी काँग्रेस, तर घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादीला किनवट आणि लोहा मतदारसंघात यश मिळाले होते. नायगावमध्ये वसंतराव चव्हाण यांनी अपक्ष बाजी मारली होती. तद्नंतर त्यांनी काँग्रेसला पाठिंबा दिला होता. २०१४ मध्ये काँग्रेसचे तीन, शिवसेनेचे चार, तर राष्ट्रवादी आणि भाजपचा प्रत्येकी एक आमदार होता. २०१९ मध्ये काँग्रेसच्या ताब्यात सर्वाधिक चार, भाजप तीन, शिवसेना एक आणि शेकापकडे एक विधानसभा मतदारसंघ होता.