आजोळातील अन्न-पाण्याशी राखले इमान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2018 01:28 AM2018-08-27T01:28:46+5:302018-08-27T01:29:17+5:30
शिवराज रामचंद्र भंडरवाड. वय वर्षे १६. जन्म आजोळी झाला. घरची आर्थिक स्थिती बेताचीच. राहायला पक्के घरदेखील नाही. त्यामुळे आजी-आजोबांनीच संगोपन केले. दहावीत शिकतानाच सुटीच्या दिवशी आजोबांच्या शेळ्या राखतो. २० आॅगस्ट रोजीही तो शेळ्या घेऊन गावाकडे परतत होता. गावातील दोघे पुरात वाहून जात असल्याचे पाहून त्याने जिवाची पर्वा न करता या दोघांना मृत्यूच्या तावडीतून बाहेर काढले.
वसंत जाधव/बालाजी मांजरमकर।
लोकमत न्यूज नेटवर्क
गडमा/मांजरम: शिवराज रामचंद्र भंडरवाड. वय वर्षे १६. जन्म आजोळी झाला. घरची आर्थिक स्थिती बेताचीच. राहायला पक्के घरदेखील नाही. त्यामुळे आजी-आजोबांनीच संगोपन केले. दहावीत शिकतानाच सुटीच्या दिवशी आजोबांच्या शेळ्या राखतो. २० आॅगस्ट रोजीही तो शेळ्या घेऊन गावाकडे परतत होता. गावातील दोघे पुरात वाहून जात असल्याचे पाहून त्याने जिवाची पर्वा न करता या दोघांना मृत्यूच्या तावडीतून बाहेर काढले.
शिवराजच्या या धाडसाची ही कहाणी सध्या जिल्हाभर चर्चेचा विषय ठरली आहे. शिवराजने ‘लोकमत’जवळ त्या दिवशीचा थरार सांगितला.
शिवराज मांजरम (ता.नायगाव) येथील जिल्हा परिषद हायस्कूलमध्ये दहावीच्या वर्गात शिकतो. देगाव (ता.नायगावचा) हे त्याचे मूळ गाव. घरची परिस्थिती अतिशय गरिबीची़ वडील मोलमजुरी करून संसाराचा गाडा हाकतात. त्यामुळे शिवराज अंगणवाडीपासून आजोबा रामू गंगाराम केशवमोड यांच्याकडेच राहतो. केशवमोड हे देखील मजुरीचे काम करतात़ २० आॅगस्ट रोजी त्याचे आजोबा बाहेरगावी गेल्याने शाळेत पहिला तास संपल्यावर वर्गशिक्षक विजय काळे यांची परवानगी घेऊन शिवराज ४० शेळ्या चारण्यासाठी माळरानावर गेला. सकाळी ११ वाजता एका शेळीने दोन पिल्लांना जन्म दिला़ मात्र पाऊस सुरू झाल्याने गावाकडे येता आले नाही. सायंकाळी पाच वाजता पाऊस कमी झाल्यावर तो ४० शेळ्यांना घेऊन गावाकडे जात होता.
रस्त्यावरील एका पुलावरून पाणी वाहत असल्याने तो तिथेच थांबला. त्याच्यापाठोपाठ मजुरीचे काम करणारे भूमिहीन मजूरदार नामदेव कोंडिबा वंजारे (४८, रा.मांजरम) हे माधवराव उद्धवराव शिंदे यांच्या बैलांना घेवून गावाकडे निघाले होते. बैल न थांबल्याने वंजारेदेखील पुलावरून जात असताना वेगातील पाण्याच्या प्रवाहात ते पडले. ते वाहून जात असल्याचे लक्षात येताच क्षणाचाही विलंब न करता शिवराजने त्यांना बाहेर काढले. थोड्या वेळाने नामदेव गावाकडे आले. परंतु, शेळ्या जवळ असल्याने शिवराज तिथेच थांबला. काही वेळानंतर शेळीपालक व्यंकट लक्ष्मण विभूते (६०, रा.मांजरम) हे एक म्हैस व शेळ्यांना घेऊन गावाकडे जाण्यासाठी पुलाच्या अगदी जवळ थांबले असता पुलावरुन त्यांची म्हैस खाली पडली. पाठोपाठ पुलाचा काही भाग कोसळला.
यातच विभूते पुराच्या पाण्यात पडले. ही घटना पाहून शिवराजने पुन्हा एकदा पाण्यात उडी घेतली़ तोपर्यंत विभूते यांनी दोन गटांगळ्या खाल्ल्या होत्या. तरीही शिवराजने त्यांना पकडून पोहत-पोहत विभूते यांनादेखील सुरक्षितपणे बाहेर काढले. या पुरात विभूते यांच्या चार शेळ्या वाहून गेल्या. या दोन्ही घटनांत मदत करताना शिवराजच्या आजोबाचा शेळ्यांमधील एक बोकड पुरात वाहून गेला. शिवराजच्या या धाडसाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
शाळेने केला सत्कार
या घटनेनंतर दुसºया दिवशी शाळेत शिवराज उशिराने आल्यामुळे शिक्षकांनी त्यास कारण विचारले.शिवराजने घडलेली हकीकत सांगितली.त्यामुळे शाळेचे मुख्याध्यापक भुजंग सोनकांबळे यांनी शिवराजच्या धाडसाचे कौतुक करण्यासाठी शालेय व्यवस्थापन समिती, ग्रामपंचायत आणि ज्येष्ठांना ही माहिती दिली. या सर्व मंडळींनी शाळेत शिवराजचा कौतुक सोहळा घेतला. शिवराजला बालशौर्य पुरस्कार देण्यात यावा, अशी मागणी शाळेने व गावकºयांनी लेखी निवेदनाद्वारे लोकप्रतिनिधी व शासनाकडे केली आहे.
अख्खी रात्र काढली जागून
शिवराजने सोबत शेळ्या असल्यामुळे व पुराचे पाणी कमी न झाल्याने व्यंकट विभूते यांच्यासह संपूर्ण रात्र मांजरम शिवारात जागून काढली. पहाटे तीननंतर ही मंडळी घराकडे परतली.
आजोबांचेच योगदान
या चांगल्या कामात आजोबांचेच खरे योगदान म्हणावे लागेल़ त्यांनी शाळेला सुटी घेऊन शेळ्या चारवण्यासाठी जाण्यास सांगितले़ म्हणून मी शेताकडे गेलो आणि या घटनेतून दोघांना वाचविले
-शिवराज रामचंद्र भंडरवाड
शिवराज देवरूपात धावला !
पुलावरून कमरेएवढे पाणी वाहत होते. आम्हाला वाचतो असे वाटले नाही. पाण्याचा वेग जास्त होता. त्यावेळी शिवराज आमच्यासाठी देवरुपात धावून आला. त्याने स्वत: चा जीव धोक्यात घालून आम्हाला वाचविले. शिवराजच्या कामाबद्दल त्याचे कौतुक करायला आमच्याकडे शब्दच नाहीत. गावच्या बाईलेकीचं हे लेकरू खूप मोठ्ठं होवो.
व्यंकट लक्ष्मण विभूते, नामदेव कोंडिबा वंजारे (रा.मांजरम.)