नांदेड जिल्हा परिषदेत कर्मचाऱ्यांच्या बदल्यांची लगबग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2019 12:10 AM2019-05-31T00:10:08+5:302019-05-31T00:13:15+5:30
जिल्हा परिषदेतील वर्ग ३ कर्मचा-यांच्या बदल्यांना १ जूनपासून प्रारंभ होणार असून ४ जूनपर्यंत ११ विभागातील कर्मचा-यांच्या बदलीची प्रक्रिया पूर्ण होणार आहे़
नांदेड : जिल्हा परिषदेतील वर्ग ३ कर्मचा-यांच्या बदल्यांना १ जूनपासून प्रारंभ होणार असून ४ जूनपर्यंत ११ विभागातील कर्मचा-यांच्या बदलीची प्रक्रिया पूर्ण होणार आहे़
जिल्हा परिषदेतील वर्ग ३ व वर्ग ४ च्या कर्मचा-यांच्या जिल्हातंर्गत बदल्या १६ ते २५ मे या कालावधीत समुपदेशनाने प्रत्यक्ष बदलीची कार्यवाही पार पाडावयाची होती़ दरम्यानच्या काळात लोकसभा सार्वत्रिक निवडणुकेची आचारसंहिता लागू होती़ या काळात बदल्यांची कार्यवाही करणे हा आदर्श आचारसंहितेचा भंग ठरत असल्याने दिलेल्या वेळापत्रकानुसार जिल्हा परिषदेतील कर्मचा-यांची बदली प्रक्रिया राबविता आली नाही़ त्यामुळे या बदल्यांना ७ जूनपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे़ यासंदर्भात शासनाने २७ मे रोजी परिपत्रक काढल्यानंतर जिल्हा परिषद प्रशासनाने बदल्यांची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी ३० मे रोजी वेळापत्रक घोषीत केले आहे़ १ जूनपासून जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात समुपदेशनाने बदल्यांची प्रक्रिया पूर्ण होणार आहे़ सर्व समुपदेशनाच्या वेळी बदलीपात्र कर्मचा-याची वास्तव्य जेष्ठता यादी आणि विनंती अर्जाची यादी अद्यावत ठेवणे, रिक्त पदाचा आणि संभाव्य रिक्त पदाचा संवर्ग निहाय अहवाल अद्यावत ठेवणे, संवर्ग निहाय रिक्त पदाचा अहवाल व संभाव्य रिक्त पदाचा अहवाल स्क्रिनवर दाखविण्यासाठी प्रोजेक्टरची व्यवस्था करणे, व्हिडीओ रेकॉर्डची व्यवस्था करणे, प्रशासकीय बदलीमधून सुट असणा-या कर्मचा-यांचे आवश्यक असणारी कागद पत्राची सत्यप्रत सोबत ठेवणे आदी सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक काकडे यांनी दिल्या आहेत़
१ जून रोजी सकाळी १० ते ११ या वेळेत बांधकाम विभाग, ११ ते १२ या वेळेत लघुपाटबंधारे विभाग, दुपारी १२ ते १ या वेळेत ग्रामीण पाणीपुरवठा विभाग, १ ते ३ या वेळेत महिला व बालकल्याण विभाग, ३ ते ४ या वेळेत कृषी विभाग व सायंकाळी ४ ते बदलीप्रक्रिया पूर्ण होईपर्यंत पशुसंवर्धन विभागाच्या बदल्या होणार आहेत़ २ जून रोजी सकाळी १० ते १ या वेळेत सामान्य प्रशासन विभाग, दुपारी १ ते ३ या वेळेत अर्थ विभाग व दुपारी ३ ते बदलीप्रक्रिया पूर्ण होईपर्यंत प्राथमिक व माध्यमिक शिक्षकाच्या बदल्या होतील़ ३ जून रोजी सकाळी १० ते बदली प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत ग्रामपंचायत विभागातील व ४ जून रोजी सकाळी १० ते बदली प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत आरोग्य विभागातील कर्मचा-यांच्या बदल्या होतील़
शिपाई पदाच्या बदल्यांची मागणी
जिल्हा परिषदेतील एकुण १३ हजार कर्मचा-यांपैकी ८ हजार ५०० शिक्षक संवर्गात येतात़ सुरूवातीस वर्ग ३ च्या कर्मचा-यांच्या बदल्या करण्यात येणार आहेत़ २ हजारांवर परिचारिक, ४५९ कनिष्ठ लिपीक, १४३ वरिष्ठ लिपीक, २४ कक्ष अधिकारी, १ हजार ८६ शिपाई, ७९ शिपाई आदी कर्मचा-यांच्या बदल्या होणार आहेत़
शिपाई पदाच्या बदल्या समुपदेशन पद्धतीने घेणे आवश्यक आहेत़ परंतु २ वर्षांपासून या बदल्या रखडल्या आहेत़ यावर्षी बदल्यांची मागणी होत आहे़ बदल्या न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा जि़ प़ कर्मचारी युनियनचे राज्य कार्याध्यक्ष बाबुराव पुजरवाड यांनी दिला आहे़