रोजगार हमी योजनेची कामे ठप्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2019 12:05 AM2019-04-30T00:05:28+5:302019-04-30T00:07:29+5:30
श्रीक्षेत्र माहूर : तालुक्यातील वानोळा परिसरात खरीप हंगामानंतर राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून सर्वाधिक रोजगार उपलब्ध होतो मात्र यावर्षी ...
श्रीक्षेत्र माहूर : तालुक्यातील वानोळा परिसरात खरीप हंगामानंतर राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून सर्वाधिक रोजगार उपलब्ध होतो मात्र यावर्षी रोहयोची कामे ठप्प आहेत. मजुरांच्या हाताला काम व कुटुंबाकडे चरितार्थ चालविण्यासाठी दाम उपलब्ध होत नसल्याने शहराकडे ग्रामिणांचे स्थलांतर वाढले आहे.
वानोळा परिसरात खरिपात सर्वाधिक रोजगार शेतीमधून निर्माण होतो. तर रबी हंगामानंतर त्यांना रोजगार पुरविते, ती राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना. शासनाने या रोजगार हमी योजनेला कायद्याचे स्वरूप दिले आहे.प्रत्येक हाताला काम व कामानुसार दाम हे या योजनेचे ब्रीदवाक्य आहे़
१०० दिवस रोजगार पुरविण्याची हमी या योजनेत आहे. रोजगार न मिळाल्यास बेरोजगार भत्ता देण्याचे प्रावधानही आहे. परंतु, वानोळा परिसरातील आठ हजार मजुरांसाठी ही योजना मृगजळ ठरू पाहत आहे. रोजगार दिला जात नसताना एकाही बेरोजगाराला बेरोजगार भत्ता देण्यात आलेला नाही, ही बाबही वास्तविकता दाखविणारी आहे. सन २०१८-२०१९ या वर्षात रोजगार हमीची कामे कमालीची रोडावली आहेत. कामे पुरवणारी यंत्रणा सुस्त आहे. आजपर्यंत लोकसभा निवडणूक व आचारसंहितेचे कारण त्यासाठी अधिकारीवर्गाकडून दिले जात आहे. आता निवडणूक संपली तरीही कामे सुरु होण्याची चिन्हे नाहीत, त्यामुळे शहरी भागात स्थलांतर होत आहे.
कुशल कामाचे वेतन थकीत
वानोळा परिसरात रोहयो कुशल कामाचे दोन वर्षांपासून लाखोंचे वेतन थकीत असल्याने रोजगार हमी योजनेकडे ग्रामपंचायतींनी दुर्लक्ष केल्याचा परिणाम जाणवत आहे. काही ग्रामपंचायतींनी कामाची मागणी करूनही प्रशासनाने कामे उपलब्ध करून दिली नाहीत, असा आरोपही ग्रा़पं़सदस्यांनी केला. वैयक्तिक लाभाच्या योजनांचे पैसेही लाभार्थ्यांच्या खात्यात न आल्याने साहित्य पुरवठादार चकरा मारत आहेत. रोहयो तांत्रिक पॅनेल अधिकाऱ्यांच्या माध्यमातून चालविली जाते, यामध्ये अंदाजपत्रके व प्रत्यक्ष काम सुरू करून मोजमाप व देयके बनविण्याच्या कामाचा समावेश आहे.
रोजगार नसलेल्या मजुराला भत्ता मिळेना
वानोळा परिसरातील आठ हजार मजुरांसाठी रोजगार हमी योजना मृगजळ ठरू पाहत आहे़ रोजगार दिला जात नसताना एकाही मजुराला बेरोजगार भत्ता देण्यात आलेला नाही. २०१८-२०१९ या वर्षात रोजगार हमीची कामे कमालीची रोडावली आहेत़ कामे पुरवणारी यंत्रणा सुस्त आहे़
आजपर्यंत लोकसभा निवडणूक व आचारसंहितेचे कारण त्यासाठी अधिकारीवर्गाकडून दिले जात आहेत़ मात्र आता निवडणूक संपली असतानाही रोहयोची कामे सुरु होण्याची चिन्हे दिसून येत नाहीत़
या पॅनलमधील काही अधिकारी दुसऱ्यांच्या नावे कंत्राट घेत ठेकेदारी करीत असल्याने त्यांचे रोहयोकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप मजुरांकडून होत आहे. मजुरांनी हाताला काम मिळावे, अशी मागणी केली आहे़