पार्डी नदीला इसापूर धरणाचे पाणी आल्याने उत्साह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2018 01:08 AM2018-12-19T01:08:24+5:302018-12-19T01:09:51+5:30
वाहणारी पार्डीची नदी गेल्या काही वर्षांपासून कोरडी पडल्याने नदीकाठावर असलेल्या गावांतील विहीर ,बोअर कोरडे पडले होते.
पार्डी : बारा महिने तुडुंब वाहणारी पार्डीची नदी गेल्या काही वर्षांपासून कोरडी पडल्याने नदीकाठावर असलेल्या गावांतील विहीर ,बोअर कोरडे पडले होते. परिसरातील गावांमध्ये पाणीटंचाई निर्माण झाल्याने जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा चिंताजनक प्रश्न उभा राहिला होता. यासंदर्भात पार्डी व देळूब येथील नागरिकांनी माजी मुख्यमंत्री खा. अशोकराव चव्हाण यांच्याकडे नदीला पाणी सोडण्याची मागणी केल्यानंतर दुस-याच दिवशी पाणी सोडण्याची कार्यवाही करण्यात आली आहे. दरम्यान, हे पाणी पार्डी नदीपर्यंत पोहोचल्याने शेतक-यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
गावोगावी पिण्याच्या पाण्यासाठी व दैनंदिन वापरासाठी नदी, नाल्याशेजारी ग्रामपंचायतकडून सार्वजनिक विहीर बांधण्यात आले होते. परंतु, नदीला पाणी नसल्याने नळाला पाणी येत नव्हते. त्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत होते. या भागातील विहीर बोअरने तळ गाठण्यास सुरुवात केल्याने विहिरीत पिण्यासाठी पुरेसे पाणी मिळत नव्हते.
दरम्यान, पार्डी गावाच्या नदीपात्रात इसापूर धरणाचे पाणी सोडण्यात आले असून नदी काठावरील पार्डी, शेणी, देळूब, कामठा बु, कोंढा, देळूब बु , बामणी, शेलगाव बु , शेलगाव खु , पिंपळगाव, सांगवी, मेंढला, निजामपूरवाडी या गावांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागला आहे. पार्डी गावालगत जलयुक्त शिवार अभियानअंतर्गत गावतळ्याचे काम करण्यात आले. या तळ्यात मोठ्या प्रमाणात पाण्याची साठवण झाली आहे. पार्डी परिसरातील गावांना या तळ्याचा फायदा होणार आहे.
तीन वर्षांपूर्वी चार बंधारे बांधण्यात आले आहेत. या बंधाºयांनाही या पाण्याचा आता फायदा होणार असल्याने पार्डीसह परिसरातील गावांतील शेतकरी समाधान व्यक्त करीत असून, पाण्याचा काळजीपूर्वक वापर करण्याची गरज आहे़
शेतक-यांची एकजुट
इसापूरच्या पाण्यासाठी विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकºयांनी एकजुट दाखवित पैनगंगा नदीपात्रात अनेक दिवस आंदोलन केले होते़ त्यात आता दोन्ही विभागातील नऊ गावांना पाणी पोहोचलेच नसल्यामुळे शेतकरी पुन्हा आक्रमक झाले आहेत़ दोन्ही विभागाच्या शेतकºयांनी एकजुट दाखवित तहसीलवर धडक दिली़ किमान पिण्याच्या पाण्यासाठी तरी प्रशासनाने पाणी देण्याची आवश्यकता व्यक्त होत होती़
नऊ गावापर्यंत पाणी पोहोचलेच नाही
विदर्भ आणि मराठवाड्याच्या सीमेवरील ९० गावांत भीषण पाणीटंचाई निर्माण झाल्यानंतर शेतक-यांनी १५ दिवस पैनगंगा नदीपात्रात आंदोलन केले़ त्यानंतर इसापूर धरणाचे पाणी पैनगंगा नदीत सोडण्यात आले़ परंतु, हे पाणी नऊ गावांपर्यंत पोहोचलेच नाही़ इसापूरचे पैनगंगा नदीत सोडलेले पाणी विदर्भातील पिंपळगाव, पेंधा, लिंगी, मुरली, सहस्त्रकुंड तांडा तर मराठवाड्यातील कौठा, धानोरा, वारंगटाकळी, मंगरुळ या नऊ गावांत पोहोचलेच नाही़ त्यामुळे संतप्त झालेल्या नऊ गावांतील ग्रामस्थांनी उमरखेड तहसील कार्यालयावर धडक मारली होती़ यावेळी माजी आ़ विजयराव खडसे यांनी उर्ध्व पैनगंगा प्रकल्प कार्यकारी अभियंता व आ़राजेंद्र नजरधने यांच्याशी संवाद साधून पाणी या गावापर्यंत पोहोचेपर्यंत ते बंद करण्यात येवू नये अशी मागणी केली़ यावेळी रोहिदास राठोड, प्रकाश वाघ मुरली, देवराव गोफणे, रमेश नाईक, युवराज जाधव, बळीराम देवकत्ते, राजू पाटील भोयर, अवधूत पाटील आदी उपस्थित होते.