नांदेड शहरातील वाहतुक सुधारणेत अतिक्रमणाचा मुख्य अडसर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2020 04:59 PM2020-02-18T16:59:47+5:302020-02-18T17:04:02+5:30
शहरात नो हॉकर्स झोनची अंमलबजावणी गरजेची
नांदेड : शहरातील वाहतूक व्यवस्थेला मुख्य अडसर हा अतिक्रमणाचा होत असल्याचे शहर वाहतूक शाखेने स्पष्ट केले असून प्रत्येक चौकातील रस्त्यालगत फुटपाथवरील अतिक्रमणे काढले तरच शहर वाहतूक व्यवस्था सुरळीत होईल, यासह अन्य उपाययोजनाही वाहतूक शाखेने महापालिकेला सूचविल्या आहेत़
नांदेड शहरातील वाढती लोकसंख्या, वाढलेली वाहने, बाजारपेठांचा विस्तार, अद्ययावत रुग्णालय ही बाब पाहता नांदेड जिल्ह्यातून तसेच आजूबाजूच्या जिल्ह्यांतूनही असंख्य वाहने नांदेडमध्ये येत आहेत़ पण शहरातील अतिक्रमणाचे प्रमाण पाहता वाहतुकीचा खोळंबा हा नित्याचीच बाब झाली आहे़ त्यामुळे हे अतिक्रमण काढून कायदेशीर खटले दाखल करावेत असेही सूचवले आहे़ प्रत्येक चौकातील हातगाडे, दुकानदारांनी रस्त्यावर, फुटपाथवर केलेले अतिक्रमण काढावे, यामुळे पार्किंगच्या जागेत वाढ होणार आहे़ शहरात सिग्नल व्यवस्थाही बंदच आहे़ महात्मा फुले मार्केट, आनंदनगर येथे केवळ नावालाच सिग्नल आहेत़ यासह डॉक्टरलेन, फुले मार्केट, नाईक चौक, आनंदनगर, भगतसिंघ चौक, बाफना याठिकाणी सिग्नल सुरू केल्यास वाहतूक नियंत्रण करता येणार आहे़ शहरात डॉक्टरलेन भागात महापालिकेने इमारतीमध्ये पार्किंगची व्यवस्था आहे की नाही, याची तपासणी करून संबंधित इमारतीत पार्किंग व्यवस्था करावी, त्यासह रुग्णालयानेच पार्किंग बोर्ड लावणे तसेच नातेवाईकांच्या मदतीसाठी वॉर्डनची नेमणूक करणे आवश्यक असल्याचे सांगितले़ असे केल्यास डॉक्टरलेनमधील वाहतुकीचा प्रश्न कायमस्वरुपी निकाली लागणार आहे़
शहरात सध्या हॉकर्स झोन निश्चित केले नाहीत़ हॉकर्सविरूद्ध कारवाई करण्यापूर्वी हॉकर्स झोनची निर्मिती आवश्यक आहे़ हॉकर्स झोन व्यतिरिक्त रस्त्यावर आलेले हातगाडे व इतर किरकोळ विक्रेत्यांना रस्त्यावरून हटवण्याचा ठराव महापालिकेने घ्यावा, हातगाड्यांना नोंदणी बिल्ला द्यावा, तसेच प्रत्येक हॉकर्सला फिरण्याचा भाग ठरवून द्यावा, त्यांना सकाळी ९ वाजल्यानंतर मुख्य रस्त्यावर बंदी घालावी अशी सूचनाही वाहतूक शाखेने केली आहे़ शहरात कुठे हॉकर्स झोन करता येईल याची यादी वाहतूक शाखेनेच मनपाला सोपविली आहे़ शहरात सिग्नलवर झेब्रा क्रॉसिंगचे पट्टे कुठेही नाहीत, ते आवश्यक आहेत़ प्रत्येक सिग्नलच्या अलीकडे किमान २०० मीटर अंतरापर्यंत लेनचे पांढरे पट्टे आवश्यक आहेत़ शहरात सर्वत्र लेनचे पांढऱ्या पट्ट्याची मार्कींग, रिफ्लेक्टर व रमलर्स स्ट्रीपसह केल्यास वाहतूक सुधारणेस मदत होईल़
लेफ्ट टर्न दाखविणारी मार्कींग आवश्यक
शहरात प्रत्येक चौकाचे वाहतूक शाखा व मनपाकडून संयुक्त सर्व्हे करून लेफ्ट टर्नची व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी त्या-त्या चौकात उपाययोजना आवश्यक आहेत़ सध्या लेफ्ट टर्नपर्यंत पार्कींग होत असल्याने वाहतुकीत अडचण येत आहे़ लेफ्ट टर्न सुरळीत ठेवण्यासाठी उपाययोजना करून त्या ठिकाणी लेफ्ट टर्न दाखवणारी मार्कींग केल्यास वाहतूक सुरळीत होण्यास मदत होईल, असे वाहतूक शाखेचे पो़ नि़ चंद्रशेखर कदम यांनी सांगितले़