उकळते दूध सांडल्याने चिमुकल्याचा अंत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2018 12:52 AM2018-03-18T00:52:11+5:302018-03-18T00:52:17+5:30
शहरातील श्यामनगर येथील स्त्री रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलेल्या दोन वर्षीय बाळाच्या अंगावर गरम दुधाचे भरलेले पातेले पडल्याने बाळाचा भाजून मृत्यू झाल्याची घटना घडली़ या प्रकरणात नातेवाईकांनी परिचारिकेच्या निष्काळजीपणामुळे बाळाचा मृत्यू झाल्याचा आरोप केला आहे़
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड : शहरातील श्यामनगर येथील स्त्री रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलेल्या दोन वर्षीय बाळाच्या अंगावर गरम दुधाचे भरलेले पातेले पडल्याने बाळाचा भाजून मृत्यू झाल्याची घटना घडली़ या प्रकरणात नातेवाईकांनी परिचारिकेच्या निष्काळजीपणामुळे बाळाचा मृत्यू झाल्याचा आरोप केला आहे़
सांगवी येथील प्रतीक वायवळ या दोन वर्षीय मुलाला सोमवारी अशक्तपणामुळे उपचारासाठी श्यामनगर येथील स्त्री रुग्णालयातील नवजात शिशू केंद्रात दाखल केले होते़ या ठिकाणी प्रतीकवर उपचार सुरु होते़ शुक्रवारी दुपारी प्रतीकची आई जेवणानंतर बेडवर बसलेली होती़ तर प्रतीक हा खाली खेळत होता़ त्याचवेळी परिचारिकेने मुलांना देण्यासाठी गरम दूध आणले़ दुधाचे पातेले एका टेबलावर ठेवले होते़ त्याचवेळी प्रतीकचा टेबलला पाय लागल्याने गरम दुधाचे पातेले त्याच्या अंगावर पडले़ त्यामुळे तो ६० टक्के भाजल्या गेल्या होता़ नातेवाईकांनी उपचारासाठी त्याला दुसऱ्या रुग्णालयात दाखल केले़ परंतु या ठिकाणी शनिवारी त्याचा उपचारा- दरम्यान मृत्यू झाला़
याप्रकरणात परिचारिकेच्या निष्काळजीपणामुळेच प्रतीकचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला होता़ तसेच या प्रकरणात परिचारिकेवर कारवाई करण्याची मागणी केली होती़ याबाबत त्यांनी जिल्हा शल्य चिकित्सकांची भेट घेतली होती़ या प्रकरणात जिल्हा शल्य चिकित्सक डॉ़बी़पीक़दम यांनी चौकशी करुन दोषी आढळल्यास परिचारिकेवर कारवाई करण्याचे आश्वासन प्रतीकच्या कुटुंबियांना दिले़
दरम्यान, दोन दिवसांपूर्वी श्यामनगर येथील स्त्री रुग्णालयात छत कोसळून मातेसह चिमुकले जखमी झाल्याची घटना घडली होती़ या घटनेत सुदैवाने चिमुकल्याचा जीव वाचला होता़ त्यानंतर शुक्रवारी पुन्हा ही घटना घडली़ त्यामुळे श्यामनगर येथील स्त्री रुग्णालयाच्या कारभाराबाबत नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे़
सोयीसुविधांबाबत नेहमीच होते ओरड
डॉ़पुष्पा हंगरगेकर यांच्या काळात श्यामनगर येथील स्त्री रुग्णालयाचे काम उत्कृष्टपणे सुरु होते़ रुग्णालयाच्या कामकाजाची अनेकवेळा प्रशंसाही करण्यात आली होती़ परंतु त्या पदावरुन दूर होताच या रुग्णालयाला अवकळा आली़ या ठिकाणी कर्तव्यावर असलेले डॉक्टर, परिचारिकांची मनमानी वाढली़ अनेकवेळा दिवसा अन् रात्री प्रसूतीसाठी आलेल्या महिलांना दाखल करुन घेतले जात नाही़ कर्मचाºयांची संख्या अपुरी असल्याचे कारण देत त्यांना थेट विष्णूपुरी येथील रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिला जातो़ अनेक कर्मचारी तर नावालाच रुग्णालयात हजेरी लावून जातात़ त्यामुळे या रुग्णालयाच्या कामकाजाबाबत आता जिल्हाधिकाºयांनीच लक्ष घालण्याची गरज आहे़