दुबईहून आलेल्या अभियंत्यावर खंजरने हल्ला; ऐनवेळी पोलिसाने गोळीबार केल्याने वाचला जीव
By शिवराज बिचेवार | Published: June 21, 2023 03:17 PM2023-06-21T15:17:16+5:302023-06-21T15:17:56+5:30
विनाक्रमांकाच्या दुचाकीवरुन दोघे-तिघे जण येवून नागरीकांना लुटत आहेत.
नांदेड- दुबई येथे अभियंता असलेल्या एका व्यक्तीला शहरातील अंबिका मंगल कार्यालयाजवळ अज्ञात तिघांनी खंजरने हल्ला करुन लुटण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी तिथे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस कर्मचारी गणेश धुमाळ आले. यावेळी चोरट्यांनी त्यांच्यावरही हल्ला केला. तोच धुमाळ यांनी आपल्या जवळील पिस्टल काढून दोन गोळ्या झाडल्या. त्यामुळे चोरट्यांनी पळ काढला असून अभियंत्याचा जीव वाचला आहे. ही थरारक घटना मंगळवारी रात्री अकरा वाजेच्या सुमारास घडली.
संतोषकुमार सायागौड कोंडा हे दुबईत अभियंता आहेत. सध्या सुट्टया असल्यामुळे ते नांदेडला आले होते. मंगळवारी रात्री जेवण करुन केल्यानंतर अंबिका मंगल कार्यालयासमोरील फुटपाथवर ते फिरत होते. त्याचवेळी स्कुटीवरुन तिघे जण त्यांच्या जवळ आले. त्यांनी खंजरने कोंडा यांच्या हातावर वार केले. तसेच गळ्याला खंजर लावून खिशातील पाकीट काढले. मोबाईल हिसकावित असताना कोंडा यांनी वाचवा-वाचवा म्हणून आरडाओरड केली. त्याचवेळी स्थानिक गुन्हे शाखेत कार्यरत असलेले पोलिस कर्मचारी गणेश धुमाळ हे दुचाकीवरुन घराकडे जात होते.
कोंडा यांचा आवाज ऐकून ते त्यांच्या जवळ गेले. तोच चोरट्यांनी त्यांच्या दुचाकीवर लाथ मारुन त्यांना खाली पाडले. त्यांच्यावरही खंजरने वार करणार तोच धुमाळ यांनी पिस्टल काढून एक गोळी हवेत झाडली. त्यामुळे बिथरलेले चोरटे पळायला लागले. धुमाळ यांनी आणखी एक गोळी त्यांच्या दिशेने झाडली. परंतु अंधाराचा फायदा घेवून चोरटे पसार झाले. जखमी कोंडा यांना धुमाळ यांनी शासकीय रुग्णालयात दाखल केले. या प्रकरणात भाग्यनगर पोलिस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पोलिस कर्मचार्याने दाखविलेल्या हिमतीमुळे कोंडा यांचा जीव वाचला.
धूमस्टाईल चोरट्यांचा धुमाकुळ
शहरात धुमस्टाईल चोरट्यांनी धुमाकुळ घातला आहे. विनाक्रमांकाच्या दुचाकीवरुन दोघे-तिघे जण येवून नागरीकांना लुटत आहेत. विशेष करुन महिला आणि वयोवृद्धांना ते टार्गेट करीत आहेत.