आंदोलकांची पगार कपात मागे घेण्याच्या मागणीसाठी अभियंतांनी जमिनीवर बसून केले काम
By प्रसाद आर्वीकर | Published: September 11, 2023 06:26 PM2023-09-11T18:26:17+5:302023-09-11T18:26:29+5:30
आंदोलन करणाऱ्या अभियंत्यांची दोन्ही दिवसांची अनुपस्थिती नोंदविली असून, पगार कपात करण्यात आला आहे.
नांदेड : महावितरण कंपनीतील अभियंतांचा दोन दिवसांचा पगार कपात केल्याच्या निशेधार्थ सोमवारी सकाळी १० ते १२ या वेळेत सर्व अभियंत्यांनी जमिनीवर बसून काम करत प्रशासनाचा निषेध नोंदविला.
येथील महावितरण कंपनीतील सब-ऑर्डिनेट इंजिनियर्स असोसिएशनचे सदस्य असलेल्या एका अभियंत्यांचे चुकीच्या पद्धतीने निलंबन केले होते. या विरुद्ध सब-ऑर्डिनेट इंजिनियर्स असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी १० व ११ मे रोजी अधीक्षक अभियंत्यांच्या कक्षामध्ये बसून ठिय्या आंदोलन केले होते. यासंदर्भात अधीक्षक अभियंत्यांनी याविरुद्ध अहवाल पाठवून आंदोलन करणाऱ्या अभियंत्यांची दोन्ही दिवसांची अनुपस्थिती नोंदविली असून, पगार कपात करण्यात आला आहे.
ही पगार कपात मागे घ्यावी, या मागणीसाठी ११ सप्टेंबर रोजी महावितरण कंपनीतील अभियंतांनी सकाळी १० ते १२ या वेळेत जमिनीवर बसून सर्व कामकाज करत पगार कपातीचा निषेध नोंदविला. या आंदोलनामध्ये सर्व अभियंते सहभागी झाले होते. दोन्ही दिवसांचे पगार कपात मागे न घेतल्यास आंदोलन आणखी तीव्र केले जाणार असून, १८ सप्टेंबर रोजी संघटनेचे सर्व सभासद आपापल्या मुख्यालयात पूर्ण कार्यालयीन वेळेमध्ये जमिनीवर बसून काम करतील, असा इशारा देण्यात आला आहे.