नांदेडमध्ये व्हॉटस्अपवर फिरली इंग्रजीची प्रश्नपत्रिका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2020 04:59 PM2020-02-19T16:59:28+5:302020-02-19T17:02:32+5:30
ज्या विद्यार्थ्याने प्रश्नपत्रिकेचा फोटो काढला, त्याचा प्रश्नपत्रिका क्रमांकही त्यावर आला
नांदेड : इयत्ता १२ वीच्या परीक्षेस मंगळवारी जिल्ह्यातील ८२ केंद्रावर प्रारंभ झाला़ मात्र परीक्षेच्या पहिल्याच दिवशी गैरप्रकार करताना १६ विद्यार्थी आढळून आले असून या सर्व विद्यार्थ्यांना निलंबित करण्यात आले आहे़ दरम्यान ११ वाजता परीक्षा सुरू झाल्यानंतर सकाळी ११़४५ च्या सुमारास व्हॉटस्अपवर इंग्रजी विषयाच्या प्रश्नाची फोटोकॉपी फिरत असल्याचे शिक्षण विभागाच्या निदर्शनास आल्यानंतर या प्रकरणी चौकशी करून संबंधित विद्यार्थ्याबाबतची माहिती शिक्षण मंडळाकडे कळविण्यात आली असून मंडळाच्या निर्देशानुसार या प्रकरणी पोलीस कारवाई करण्यात येणार आहे़
इयत्ता १२ वीच्या परीक्षेस जिल्ह्यातील ८२ केंद्रावर मंगळवारी प्रारंभ झाला़ ३८ हजार ७११ विद्यार्थी या परीक्षेस बसले असून परीक्षा सुरळीत पार पडावी यासाठी शिक्षण विभागाच्या वतीने १५७ परीक्षा केंद्रासाठी १२७ बैठी पथके निर्माण करण्यात आली आहे़ मंगळवारी ३७ हजार ७९८ विद्यार्थ्यांनी इंग्रजीचा पेपर दिला़ दरम्यान, परीक्षा सुरू झाल्यानंतर सुमारे ४५ मिनिटांनी व्हॉटस्अपवर इंग्रजी विषयाच्या प्रश्नपत्रिकेतील काही प्रश्नांची फोटोकॉपी फिरत असल्याचे निदर्शनास आले़ याबाबत शिक्षण विभागाने तातडीने शिक्षण मंडळाला ही बाब कळविली आहे़ सदर फोटोकॉपीवर ज्या विद्यार्थ्याने प्रश्नपत्रिकेचा फोटो काढला, त्याचा प्रश्नपत्रिका क्रमांकही असल्याचे या प्रकरणी संबंधित विद्यार्थ्यावर पोलीस कारवाई करण्यात येणार आहे़ सदरील प्रश्नपत्रिका मुखेड तालुक्यातील उमरदरी परीक्षा केंद्रावरून वायरल झाल्याची प्राथमिक माहिती असल्याचे माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी बी़आरक़ुंडगीर यांनी सांगितले़