रस्त्यासाठी नांदेडमधील अख्खे गावच बसले उपोषणाला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2019 11:42 AM2019-08-17T11:42:44+5:302019-08-17T11:44:33+5:30
८० वर्षांच्या म्हाताऱ्यासह महिलाही उपोषणात सहभागी
कुरुळा (जि़ नांदेड) : कंधार तालुक्यातील मौजे महालिंगी येथील गावकऱ्यांनी स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून रस्त्यासाठी आबालवृद्धांसह तीन दिवसांपासून उपोषण सुरू केले आहे़ तालुक्यापासून ३५ किमीवर असलेल्या या गावाला जाण्यासाठी रस्ताच नाही़ त्यामुळे १७६० लोकसंख्येच्या या गावातील ग्रामस्थांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे़
शिक्षण, बाजार व रोजगारासाठी १० कि.मी.वर असलेल्या हाडोळती येथे जावे लागते. त्यात महालिंगी ते शेलदरा हा रस्ता खचून गेला आहे़ नाल्याच्या पाण्यात मागील एक मुलगा आणि काही जनावरे वाहून गेल्याची घटना ताजी आहे़ १९७२ ला कच्चा रस्ता झाल्याचे माजी सरपंच विश्वंभर नारायण कुटे हे सांगतात़ येणारी बसही रस्ता नसल्यामुळे बंद झाली आहे़ तर रुग्णांनाही खाटेवरुन न्यावे लागते. यामुळे सर्व गावच उपोषणाला बसले आहे़ ही आरपारची लढाई लढायची असल्याचा इशारा वृद्ध तुकाराम गोपाळ गुंठे यांनी दिला़ तर विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकणार असल्याचे रुक्मिणीबाई गिते, मंगलबाई भागवत गुटे, गोदावरीबाई कुठे, अनुसया पांचाळ या महिलांनी सांगितले. भाऊ गुटे, बाबूराव केंद्रे, अशोक गुट्टे, नागोराव गुट्टे यांनी जिल्हाधिकारी, तहसीलदार व बांधकाम विभागाला निवेदन दिले
संबंधित जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना माहिती कळवली़ तसेच गटविकास अधिकारी कंधार यांना माहिती दिली़ लवकरात लवकर रस्ता करुन देण्यात येईल, असे संबंधित विभागाने सांगितले. तसेच नायब तहसीलदार सारंग चव्हाण यांना घटनास्थळी पाठवले असून मदत करू
- सखाराम मांडवगडे, तहसीलदार, कंधार
आम्ही मागील काळात खूप वेळा हा प्रश्न शासनदरबारी मांडला़ मात्र आमच्याकडे कानाडोळा झाला असून अनेक पिढ्या समस्या सहन करत जगल्या़ त्यामुळे आता आंदोलनाचा निर्णय घेतला आहे़
- विश्वंभर गुंटे, माजी सरपंच