डोंबिवलीतील प्रदूषणासाठी पर्यावरण विभाग जबाबदार; उद्योगमंत्री देसाईंचा घराचा आहेर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2020 12:21 PM2020-02-05T12:21:42+5:302020-02-05T12:28:25+5:30
कारखान्यातील जलवायू प्रदूषणामुळे आरोग्याच्या अनेक समस्यांचा सामना इथल्या नागरिकांना करावा लागतोय.
नांदेड - डोंबिवली एमआयडीसीतील रासायनिक कंपन्यामुळे डोंबिवलीकरांचा जगणं मुश्किल झाल आहे. कारखान्यातील जलवायू प्रदूषणामुळे आरोग्याच्या अनेक समस्यांचा सामना इथल्या नागरिकांना करावा लागतोय. त्यासाठी पर्यावरण विभाग जबाबदार असल्याचा आरोप उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी केला आहे. कृष्णर एमआयडीसीतील जागांची पाहणी करण्यासाठी बुधवारी ते नांदेड दौऱ्यावर आले असताना माध्यमांशी ते बोलत होते.
देसाई म्हणाले, डोंबिवलीत हिरवा पाऊस पडला होता. तर मागच्याच वर्षी एमआयडीसीच्या दावडी गावात गणेशमूर्ती काळवंडल्याचा प्रकार घडला होता. नाल्यात हिरवं, लाल रंगाचं पाणी येणं, घरातल्या भांड्यांवर काळ्या पावडरचा थर जमणं हे प्रकारही डोंबिवलीकरांना नवीन नाहीत. कारखान्यातून होणारे जल वायू प्रदूषणावर कारवाई करण्याचे अधिकार हे पर्यावरण विभागाला आहेत. मी स्वतः अनेकदा कारवाईची मागणी केली आहे म्हणत स्वतःची पर्यावरण विभागाबाबतची हतबलता अप्रत्यक्षपणे दाखवली.
डोंबिवली एमआयडीसीमधली प्रोबेस कंपनीत मागच्या वर्षी २६ मे रोजी भीषण स्फोट झाला होता. स्फोट इतका भीषण होता, की कंपनीचे मालक असलेल्या वाकटकर यांची दोन्ही मुलं, सून यांच्यासह एकूण १२ जणांचा मृत्यू झाला होता, तर २०० पेक्षा जास्त जण जखमी झाले होते. प्रोबेसचा स्फोट यामुळं डोंबिवलीच्या मानवी वस्तीत असलेल्या या कंपन्या इथून हलवाव्यात, अशी मागणी करण्यात येत होती. त्यानुसार राज्याच्या उद्योगमंत्र्यांनी या कंपन्या स्थलांतरित करण्याचं आश्वासन दिलं होतं. पण अजूनही या आश्वासनाची पूर्तता झाली नाही. कारखानदारांच्या संघटनांशी आम्ही बोललो पण त्यांनी स्थलांतरणास नकार दिलाय त्यामुळे आता शासन एकतर्फी निर्णय घेण्याचा विचार करत आहे. पर्यायी जागाही शासनाने शोधली असल्याची माहिती उदयॊग्यमंत्र्यांनी दिलीय.