पाणीप्रश्न सोडविण्यासाठी मराठवाडा सिंचन व पाणी परिषदेची होणार स्थापना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2018 12:31 AM2018-12-24T00:31:29+5:302018-12-24T00:34:31+5:30

दिग्रस बंधाऱ्यातून नांदेडसाठी पाणी आणण्यात आले़ नांदेडच्या हक्काचे पाणी मिळविण्यासाठी आपल्याला संघर्ष करावा लागला़ शेजारील जिल्हा असलेल्या परभणीकरांनी त्याला विरोध केला़ त्यामुळे मराठवाड्यातील प्रश्नावर एकजुट दाखवित असताना जिल्ह्या-जिल्ह्यात होणारी भांडणे रोखण्याची गरज आहे़

Establishment of Marathwada Irrigation and Water Council to resolve water disputes | पाणीप्रश्न सोडविण्यासाठी मराठवाडा सिंचन व पाणी परिषदेची होणार स्थापना

पाणीप्रश्न सोडविण्यासाठी मराठवाडा सिंचन व पाणी परिषदेची होणार स्थापना

Next

नांदेड : दिग्रस बंधाऱ्यातून नांदेडसाठी पाणी आणण्यात आले़ नांदेडच्या हक्काचे पाणी मिळविण्यासाठी आपल्याला संघर्ष करावा लागला़ शेजारील जिल्हा असलेल्या परभणीकरांनी त्याला विरोध केला़ त्यामुळे मराठवाड्यातील प्रश्नावर एकजुट दाखवित असताना जिल्ह्या-जिल्ह्यात होणारी भांडणे रोखण्याची गरज आहे़ यामध्येच आपली अधिक शक्ती खर्च होत असल्याचे प्रतिपादन आ़डी़पी़सावंत यांनी केले़
पीपल्स कॉलेजमध्ये आयोजित मराठवाडा सिंचन व पाणी परिषदेच्या स्थापनेसाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते़ यावेळी आ़ सावंत बोलत होते़ ते म्हणाले, मराठवाड्यावर सातत्याने अन्यायच होत आला आहे़ डॉ़ शंकरराव चव्हाण यांनी दूरदृष्टी ठेवून जायकवाडी, विष्णूपुरी धरण बांधले़ परंतु, पश्चिम महाराष्ट्रातील नेत्यांनी जायकवाडीच्या वरच्या भागात धरणे बांधून घेतली़ त्यामुळे ते मराठवाड्याला पाणी सोडत नाहीत़ त्यामुळे सरकार कुणाचेही असो सिंचन खात्याचा मंत्री मात्र मराठवाड्याच असणे गरजेचे आहे़ समुद्रात जाणारे पाणी गोदावरीत सोडण्याची योजना आहे़ परंतु, त्यातील ५० टीएमसी पाणी अगोदर जायकवाडीसाठी आरक्षित करा, असेही आ़ सावंत म्हणाले़ आ़ अमरनाथ राजूरकर म्हणाले, परिषदेला लढा उभारण्यासाठी पैशाची गरज लागणार आहे़
न्यायालयील लढाईसाठी खूप पैसे लागतात़ त्यामुळे आमदार या नात्याने परिषदेसाठी एक लाख रुपये देणार असल्याचे ते म्हणाले़ माजी आ़ शंकर धोंडगे यांनी लोकप्रनिधींच्या पाठिंब्याच्या विषयाची खिल्ली उडविली़ कोणत्याही लढाईसाठी सहानुभूतीची गरज नसून प्रत्यक्ष मैदानावर उतरावे लागते़ मी लाख रुपये देवू शकत नसलो तरी, वेळ पडल्यास महिनाभर तुरुंगात मात्र राहू शकतो असे वक्तव्य केले़ त्यावर उपस्थितांमध्ये हशा पिकला होता़ माजी आ़ डी़ आऱ देशमुख यांनी लोकप्रतिनिधींच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करीत सभागृहात आजपर्यंत किती लोकप्रतिनिधींनी मराठवाड्याच्या प्रश्नांवर आवाज उठविला ? असा प्रश्न केला़ पश्चिम महाराष्ट्रातील नेत्यांची दादागिरी चालते़ परंतु मराठवाड्यातील लोकप्रतिनिधींचा अभ्यास किती आहे? असेही ते म्हणाले़ तर डॉ़ व्यंकटेश काब्दे यांनी पाणी हाच मुख्य प्रश्न घेवून समितीची स्थापना करण्यात येणार आहे़ त्यासाठी लोकप्रतिनिधी आणि जनतेच्या पाठबळाची गरज असल्याचे सांगितले़
लोकप्रतिनिधी लग्नसोहळ्यात मग्न
रविवारी मराठवाडा सिंचन व पाणी परिषदेच्या स्थापनेसंदर्भात महत्त्वपूर्ण बैठक आयोजित केली होती. पाण्यासाठी नांदेड शहरासह जिल्ह्याची परिस्थिती चिंताजनक आहे. या प्रश्नावर या बैठकीत चिंतन होणे अपेक्षित होते. मात्र प्रत्यक्षात चित्र वेगळेच होते. लोकप्रतिनिधी लग्नसोहळ्यांच्या गडबडीतच होते. अनेकांनी बैठक अर्धवट सोडून कार्यक्रम असल्याचे सांगितले. लोकप्रतिनिधींच्या घाईमुळे संयोजकांनी ज्या हेतूने बैठक आयोजित केली होती तो हेतू निश्चितच पूर्ण झाला नसल्याची चर्चा होती.

Web Title: Establishment of Marathwada Irrigation and Water Council to resolve water disputes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.