नांदेडातील समित्यांची होणार स्थापना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2018 01:05 AM2018-10-25T01:05:52+5:302018-10-25T01:06:33+5:30
अनुराग पोवळे। लोकमत न्यूज नेटवर्क नांदेड : सत्तास्थापनेपासून रखडलेल्या विविध समित्यांवरील निवडी आता निवडणुकीच्या तोंडावर करण्याची तयारी केली जात ...
अनुराग पोवळे।
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड : सत्तास्थापनेपासून रखडलेल्या विविध समित्यांवरील निवडी आता निवडणुकीच्या तोंडावर करण्याची तयारी केली जात आहे. नांदेड जिल्ह्यात विविध समित्यांवर २९ आॅक्टोबर रोजी होणाऱ्या नियोजन समितीच्या बैठकीत निवडी होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. या निवडीच्या हालचालींना प्रशासकीय पातळीवर वेग आला आहे. त्याचवेळी राजकीय पातळीवरही उलथापालथ सुरु आहे.
राजकीय क्षेत्रातील कार्यकर्त्यांना सत्तास्थापनेनंतर विविध समित्यांवर नियुक्त्या देवून त्यांना सामावून घेण्याचा प्रयत्न केला जातो. यातही नाराज कार्यकर्त्यांना प्राधान्याने समाविष्ट केले जाते. मात्र जिल्ह्यात आता या समित्यांची उत्सुकता संपली असून लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजत आहे. त्यानंतर विधानसभा निवडणुकाही होणार आहेत. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरच या समित्यांवरील नियुक्त्या घोषित केल्या जात असल्याचे राजकीय कार्यकर्तेही जाणून आहेत.
जिल्ह्यात विविध २७ समित्या आहेत. त्यातमध्ये सार्वजनिक वितरण व्यवस्थेमार्फत आवश्यक वस्तंूवर देखरेख ठेवण्यासाठी जिल्हास्तरीय दक्षता समिती, जिल्हा होमगार्ड समिती, जिल्हास्तरीय बोगस वैद्यकीय व्यावसायिकांना आळा घालण्यासाठीची पुनर्विलोकन समिती, कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी जिल्हा शांतता समिती, तालुकास्तरीय शांतता समिती, जिल्हा अल्पसंख्याक कल्याण समिती, जिल्हास्तरीय रोजगार हमी समिती, जिल्हा पर्यावरण समिती, जिल्हा सर्वसमावेश महिला सल्लागार समिती, जिल्हा भ्रष्टाचार निर्र्मूलन समिती व तालुका भ्रष्टाचार निर्मूलन समिती, जिल्हास्तरीय मागासवर्गीय शासकीय तसेच अनुदानित वसतिगृह निरीक्षण समिती, तालुकास्तरीय वसतिगृह निरीक्षण समिती, अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक नियमाचे प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हा दक्षता व नियंत्रण समिती, वसंतराव नाईक तांडा वसतिसुधार समिती, जिल्हास्तरीय आत्मा समिती, जिल्हास्तरीय बालकामगार निर्मूलन समिती, वेठबिगार प्रतिबंधक दक्षता समिती, जिल्हास्तरीय गर्भधारणापूर्व व प्रसूतीपूर्व निदान तंत्र लिंग निवडीस प्रतिबंधक समिती, तालुकास्तरीय संजय गांधी योजना समिती, अपंग कल्याण समिती, जिल्हा खनिज प्रतिष्ठान अंतर्गत व्यवस्थापन समिती आदी समित्यांचा समावेश आहे.
जिल्हा नियोजन समितीच्या २९ आॅक्टोबर रोजी होणाºया सभेत या समित्यांवरील नियुक्त्या होण्याची शक्यता आहे. पालकमंत्री रामदास कदम या नियुक्त्या करणार आहेत. सरकारमध्ये समाविष्ट शिवसेनेला जिल्ह्यात या समित्यांवर वर्चस्व राखण्याची संधी पालकमंत्र्यांच्या रुपात निर्माण झाली आहे.
जिल्ह्यात असलेल्या सेना-भाजपा आमदारांच्या शिफारशींपैकी पालकमंत्री नेमके कोणाला झुकते माप देतात, याकडेही लक्ष लागले आहे. मागील काही काळातील पालकमंत्र्यांनी काँग्रेससोबत घेतलेली मिळत्याजुळत्या भूमिकाचा आश्चर्यकारक लाभ होईल का? याकडे लक्ष लागले आहे. नांदेड महापालिकेच्या निवडणुकीत अनेक इच्छुकांना समित्यांवर नियुक्त्या देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. हे आश्वासन आता कितपत पूर्ण होईल हेही सोमवारी स्पष्ट होणार आहे.
या निवडीच्या माध्यमातून सेना-भाजपातील अंतर्गत धूसफूसही पुढे येणार आहे. निवडीनंतर समित्यांवर नियुक्त्या न झालेले नाराज कार्यकर्ते कोणती भूमिका घेतील, हेही पहावे लागणार आहे. आगामी काळातील लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत त्यांची भूमिका महत्त्वपूर्ण ठरणार आहे.