अंदाज समिती परतली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 5, 2018 12:52 AM2018-01-05T00:52:26+5:302018-01-05T00:52:38+5:30
जिल्ह्यातील विविध विकास कामांचा विश्रामगृहातच आढावा घेऊन राज्य विधान मंडळाची अंदाज समिती गुरुवारी परतली. जिल्ह्यातील तणावपूर्ण परिस्थितीमुळे या समितीला कोणत्याही कामाला प्रत्यक्ष भेट देवून पाहणी करता आली नाही.
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड : जिल्ह्यातील विविध विकास कामांचा विश्रामगृहातच आढावा घेऊन राज्य विधान मंडळाची अंदाज समिती गुरुवारी परतली. जिल्ह्यातील तणावपूर्ण परिस्थितीमुळे या समितीला कोणत्याही कामाला प्रत्यक्ष भेट देवून पाहणी करता आली नाही. विधानसभा अध्यक्षांच्या परवानगीने कामांना भेटी देण्यासाठी समितीचा फेरदौरा काढण्यात येईल, असे समितीप्रमुख आ. अनिल कदम यांनी सांगितले.
जिल्ह्यातील महापालिका, नगरपालिका, जलसंपदा, सार्वजनिक बांधकाम विभाग, जलयुक्त शिवार योजना आदी योजनेअंतर्गत झालेल्या कामांची पाहणी करण्यासाठी आ. कदम यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी नांदेडात समिती दाखल झाली होती.
समितीचे १३ सदस्य आले होते. मात्र जिल्ह्यातील अशांत परिस्थितीमुळे समितीचा पहिला दिवस हा विश्रामगृहातच गेला. दुसºया दिवशी समितीने प्रत्यक्ष पाहणी करण्याऐवजी विश्रामगृहात बैठक घेतली.या बैठकीत विविध कामांचा आढावा घेण्यात आला. त्यानंतर समितीप्रमुखांनी सदर समिती आपला अहवाल विधान मंडळापुढे ठेवणार असल्याचे सांगितले.
हा अहवाल गोपनीय असतो. तसेच समितीला माध्यमांशी बोलण्याची परवानगी नसते, असेही त्यांनी नमूद केले. त्याचवेळी समितीकडे अनेक तक्रारी प्राप्त झाल्याचे सांगत त्यांची माहिती घेतली. परिस्थितीमुळे कामांना प्रत्यक्ष भेटी देता आल्या नसल्या तरी विधानसभा अध्यक्षांच्या परवानगीने समितीचा फेर दौरा काढण्यात येईल, असेही आ. कदम यांनी सांगितले.
जिल्ह्यात दोन दिवस निर्माण झालेली अशांत परिस्थिती आणि त्यातच विधान मंडळाची अंदाज समिती जिल्ह्यात दाखल झाल्याने प्रशासनाची मोठी धावपळ उडाली. गुरुवारी जनजीवन पूर्वपदावर आल्याने व समितीही परतल्याने अधिकाºयांनी समितीच्या नियोजनासाठी झालेल्या सर्व प्रयत्नांची चर्चा करत सायंकाळी सुटकेचा श्वास सोडला.