आघाडी सरकारकडून जातीय राजकारण - विनायक मेटे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2021 04:06 AM2021-07-13T04:06:15+5:302021-07-13T04:06:15+5:30
देगलूर-बिलोली विधानसभा मतदारसंघात शिवसंग्रामच्या माध्यमातून सुरेखा पुणेकर यांनी भाजपकडे उमेदवारी मागितली आहे. यानिमित्ताने मेटे यांनी नांदेड दौरा केला असता ...
देगलूर-बिलोली विधानसभा मतदारसंघात शिवसंग्रामच्या माध्यमातून सुरेखा पुणेकर यांनी भाजपकडे उमेदवारी मागितली आहे. यानिमित्ताने मेटे यांनी नांदेड दौरा केला असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. या वेळी त्यांनी प्रत्येक समाजाला प्रतिनिधित्व मिळाले पाहिजे, अशी भूमिका मांडली. त्यांच्या समवेत शिवसंग्रामचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील, सचिन पाटील हिवराळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
आमदार विनायक मेटे यांनी राज्य सरकारवर सडकून टीका केली. तत्कालीन मुख्यमंत्री फडणवीस यांनी मराठा समाजाला दिलेले आरक्षण उद्धव ठाकरे सरकारला टिकवता आले नाही. त्यांनी न्यायालयात चुकीची कागदपत्रे सादर केल्याचा आरोपही मेटे यांनी केला. तसेच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मराठा समाजाच्या प्रश्नाबद्दल राज्य सरकारला मार्गदर्शन केले नाही. हे मराठा समाजाचे दुर्दैव असल्याची टीका आमदार विनायक मेटे यांनी केली. मराठा समाजाला आरक्षण देण्याची त्यांची इच्छा आहे की नाही मला माहीत नाही. पण, सरकार ज्या पद्धतीने मराठा आरक्षणावर भूमिका घेत आहे त्यावरून मराठा समाजाला आरक्षण देण्याची सरकारची भूमिका नाही, असे स्पष्ट दिसत असल्याची टीका त्यांनी केली. आजघडीला सरकारकडून सर्वच समाजाचे प्रश्न चुकीच्या पद्धतीने हाताळले जात असल्याचेही ते म्हणाले.
चाैकट
भाजपने मुंडे कुटुंबाला खूप दिले...
खासदार प्रीतम मुंडे यांना मंत्रीपद न मिळाल्याने त्यांच्या समर्थकांनी राजीनामे दिले. पण त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे राजीनामे द्यावे, तरच ते स्वीकारले जातील, अशी प्रतिक्रिया देत आमदार विनायक मेटे यांनी मुंडे यांच्याकडून राजीनामासत्र नाट्य सुरू असल्याचे अप्रत्यक्षपणे सांगितले. ते म्हणाले, भाजपने मुंडे कुटुंबाला खूप काही दिले. याची जाणीव आमदार पंकजा मुंडे आणि खासदार प्रीतम मुंडे यांना आहे. त्यामुळे पंकजा मुंडे कोणताही चुकीचा निर्णय घेतील, असे आपल्याला वाटत नाही, असे मेटे यांनी सांगितले.