७४ वर्षातही आदिवासी वस्तीला पक्का रस्ता नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2021 04:15 AM2021-01-02T04:15:23+5:302021-01-02T04:15:23+5:30
तालुक्यातील अंबाडी तांडा ग्रामपंचायतीच्या हद्दीत येणाऱ्या वरगुडा या आदिवासी वस्तीला आजही पक्का रस्ता नाही. २०१५-१६ मध्ये अंबाडी तांडा बसस्थानक ...
तालुक्यातील अंबाडी तांडा ग्रामपंचायतीच्या हद्दीत येणाऱ्या वरगुडा या आदिवासी वस्तीला आजही पक्का रस्ता नाही. २०१५-१६ मध्ये अंबाडी तांडा बसस्थानक ते वरगुडा घाटाच्या अलीकडील रस्ता झाला आहे. मात्र घाटातील दीड किलोमीटर अंतराचा रस्ता जंगल क्षेत्रामुळे झालाच नाही. त्यामुळे या वस्तीतील जनतेला अजूनही तीन ते चार किलोमीटर पायपीट अंबाडी तांडा बसथांब्यावर येऊन नंतर एखाद्या वाहनाने किनवट असो किंवा अन्य ठिकाणी जावे लागत आहे. रात्रीच्या वेळी वन्य श्वापदांचा सामना करत ये-जा करण्याची वेळ आजही वरगुडा येथील जनतेवर आहे.
गेल्या कित्येक वर्षांपासून रस्त्याचा प्रश्न कायम आहे. गांव तिथे रस्ता बारामाही रस्ते डांबरीकरणाने जोडणार हा उपक्रम राबविण्यात आला. पण वरगुड्याच्या रस्त्याचा प्रश्न अजूनही सुटलेला नाही. त्यामुळे तत्कालीन राज्य सरकारने ‘जिथे विकासाची बात तिथे आदिवासीपासून सुरुवात’ हे घोषवाक्य जाहीर केले होते. पण वरगुडा येथील आदिवासी अजूनही उपेक्षितच आहे.
राज्याच्या महाविकास आघाडी सरकारने किनवट या आदिवासी तालुक्यातील वन रस्ता असलेल्या वरगुडा या आदिवासी वस्तीचा वर्षानुवर्षे प्रलंबित असलेल्या रस्त्याचा प्रश्न मार्गी लावावा अशी मागणी होत आहे.
शुक्रवारी जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर व त्यांच्या टीमने प्रशासन आपल्या गावी हा उपक्रम राबविला. आता जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी, वनविभागाचे उपवनसंरक्षक व इतर जिल्हास्थित अधिकाऱ्यांनी वरगुडा या आदिवासी वस्तीला भेट देऊन तेथील आदिवासींची समस्या जाणून घ्यावी अशी मागणी वरगुडा येथील आदिवासी करीत आहेत. स्वातंत्र्याच्या ७४ वर्षातही पक्का रस्ता नसल्याने जंगल भागात असलेले आदिवासी पक्क्या रस्त्याच्या आजही प्रतीक्षेत आहेत हे विशेष.