कारवाईनंतरही माफियांकडून जिल्ह्यात वाळू उत्खनन सुरूच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2019 01:01 AM2019-05-08T01:01:44+5:302019-05-08T01:02:10+5:30
परिसरात रात्रीच्या वेळी चोरट्या मार्गाने वाळूची तस्करी होत आहे. मुदखेड तालुक्यातील घाट पाण्याखाली असून, उत्खनन बंद असतानाही वाळू बाहेर येते कुठून ? असा प्रश्न निर्माण झाला.
बारड : परिसरात रात्रीच्या वेळी चोरट्या मार्गाने वाळूची तस्करी होत आहे. मुदखेड तालुक्यातील घाट पाण्याखाली असून, उत्खनन बंद असतानाही वाळू बाहेर येते कुठून ? असा प्रश्न निर्माण झाला. काही दिवसांपूर्वी जिलेटीनद्वारे संक्शन पंप उद्ध्वस्त करण्यात आला होता, तरीही उत्खनन सुरु असल्याने हा प्रकार चर्चेचा ठरला आहे.
आजही मुदखेड तालुक्यातील वासरी, खुजडा, टाकळी, शंखतीर्थ, आमदुरा, देवापूर, येळी, महाटी या गावांतून गोदावरी पात्रातून गाढवाच्या सहाय्याने वाळू बाहेर काढण्याचे काम रात्री-बेरात्री सुरु आहे. हा रेतीसाठा शेतात करण्यात येत आहे. काही घाटांवर मशीनच्या सहाय्यानेदेखील वाळू काढणे सुरु आहे. एकीकडे वाळू बंद मात्र उपसा कायम चालू असल्याने चोरट्या मार्गाने अव्वाच्या सव्वा भावाने विक्री होत आहे. शासनाचे वाळूधोरण नियमांचे सर्रास उल्लंघन होत असून रात्री उशिरापर्यंत विनापावती वाळू पार्सल होत आहे. वाळू उत्खननामुळे शासनाचा लाखो रुपयांचा कर मातीत जात असला तरीही प्रशासनाचे अधिकारी याकडे लक्ष देण्यास तयार नाहीत. काही अधिकाऱ्यांनी कारवाई करण्याचे निव्वळ थोतांड चालविले आहे. दुसरीकडे उमरी तालुक्यातील घाटावरील वाळूही मुदखेड तालुक्यात विनापावती येत आहे.
माचनूर येथे तीन जेसीबी जप्त
लोकमत न्यूज नेटवर्क
सगरोळी : सगरोळी परिसरातील मांजरा नदी पात्रातील रेतीघाटात उत्खनन चालु असतांना माचनुर रेती घाटाला बिलोलीचे उपजिल्हाधिकारी अमोलसिंह भोसले यांनी ७ मे रोजी दिलेल्या भेटी दरम्यान तीन जेसीबी जप्त केल्या आहेत.या झालेल्या कारवाईमुळे ठेकेदाराचे धाबे दणाणले आहेत. सगरोळी परिसरातील सगरोळी व माचनुर हे रेती घाट चालु झालेले आहेत. चालु झालेल्या पहिल्याच दिवशी महसुल प्रशासनाने ओव्हर लोडिंगच्या नावाखाली कांही ट्रक जप्त करुन कारवाई करीत दंड आकारण्यात आला होता. तर सगरोळी शासकिय रेती घाटावारील बनावट पावत्यांच्या नावाखाली जिल्हाधिकारी यांनी देगलुर येथे २७ वाहनावर दंडात्मक कारवाई केली. चार दिवसानंतर माचनूर घाटावर ही कारवाई केली आहे. नव्यानेच रूजू झालेले उपजिल्हाधिकारी अमोलसिंह भोसले , सहाय्यक पोलीस निरिक्षक विनोद कांबळे, तलाठी गजानन चमकुरे यांचा सहभाग होता.
दरम्यान प्रशासनाने सुरू केलेल्या या ठोस कारवाईनंतर अवैध वाळू उत्खनन करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
वाळू तस्करीचा व्यवसाय जोरात
मुदखेड तालुक्यातील वासरी, खुजडा, टाकळी, शंखतीर्थ, आमदुरा, देवापूर, येळी, महाटी आदी गावच्या गोदावरी नदीपात्रातून गाढवांच्या सहाय्याने वाळू तस्करीचा व्यवसाय जोरात सुरू
जिलेटीनद्वारे संक्शन पंप उद्ध्वस्त करण्याची कारवाई निव्वळ थोतांड असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे़