फोडाफोडीच्या राजकारणानंतरही इस्लापूर ग्रामपंचायतीवर महाविकास आघाडीचाच झेंडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2021 04:17 AM2021-02-14T04:17:25+5:302021-02-14T04:17:25+5:30
किनवट तालुक्यातील मोठी ग्रामपंचायत म्हणून इस्लापूरला ओळखले जाते. या ग्रामपंचायतीवर गेल्या अनेक वर्षांपासून भाजपची सत्ता होती. मात्र यावेळी राष्ट्रवादी ...
किनवट तालुक्यातील मोठी ग्रामपंचायत म्हणून इस्लापूरला ओळखले जाते. या ग्रामपंचायतीवर गेल्या अनेक वर्षांपासून भाजपची सत्ता होती. मात्र यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस व शिवसेना या महाविकास आघाडीने एकहाती सत्ता काबीज करत १५ पैकी १२ सदस्य निवडून आणले. भाजपला केवळ तीन जागांवर समाधान मानावे लागले. तरी पण सत्ता काबीज करण्यासाठी फोडाफोडीच्या राजकारणाचा प्रकार घडला. शिवसेनेचे दोन व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे एक असे तीन सदस्य फोडण्यात यश आले. असले तरी इस्लापूर ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या शारदा अनिल शिनगारे या नऊ मते घेऊन विजयी झाल्या. तर त्यांचे प्रतिस्पर्धी शिवसेना भाजपच्या दीक्षा अरुण बोनगीर यांना केवळ सहा मते मिळाली उपसरपंचपदाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या निर्मला बालाजी दुरपुडे ह्या नऊ मते घेऊन विजयी झाल्या. त्यांचे प्रतिस्पर्धी निरजा विजय तोटावार यांना केवळ सहा मते घेऊन समाधान मानावे लागले. फोडाफोडीच्या राजकारणात महाविकास आघाडीने इस्लापूर ग्रामपंचायतीवर अखेर सत्ता स्थापन झाली आहे.
फोडाफोडीच्या राजकारणाला जेंव्हा सुरुवात झाली तेंव्हा माजी आमदार प्रदीप नाईक यांनी इस्लापूर ग्रामपंचायतीची जबाबदारी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ता अध्यक्ष प्रकाश राठोड व कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अनिल कऱ्हाळे पाटील यांच्यावर टाकली. या दोघांनी भाजपाचे मनसुबे उधळून लावत शारदा अनिल शिनगारे यांना सरपंच तर निर्मला बालाजी दुरपुडे यांना उपसरपंचपदी विराजमान केले. सरपंच उपसरपंचपदी महिलाच विराजमान झाल्याने इस्लापूर ग्रामपंचायतीवर महिलाराज आले आहे.