वर्ष लोटले तरी मुहूर्त सापडेना, नगर विकासच्या ३७२० पदांची भरती केव्हा?
By रामेश्वर बालाजीराव काकडे | Published: January 25, 2024 06:01 PM2024-01-25T18:01:26+5:302024-01-25T18:05:02+5:30
नगर परिषद-पंचायतीत हजारो जागा रिक्तच
नांदेड : नगरविकास विभागातील ३७२० विविध पदांची भरती करण्यासंदर्भात शासनाकडून सुशिक्षित बेरोजगारांना आश्वस्त करण्यात आले होते. पण, वर्ष लोटले तरी अद्याप भरतीबाबत शासनस्तरावर कुठल्याच हालचाली नसल्याने नगर परिषद व पंचायतीत हजारो जागा रिक्तच आहेत.
राज्यातील सर्व महानगरपालिका, नगर परिषदा, पंचायतींमध्ये ५५ हजारांपेक्षा अधिक पदे रिक्त आहेत. त्यातील राज्यस्तरीय संवर्ग आणि नागरी संस्थांमधील ४० हजार विविध पदांची भरती प्रक्रिया लवकरच सुरू करण्यात येईल, असे आश्वासन जानेवारी २०२३ मध्ये राज्य शासनाने दिले होते. पण, ११ जानेवारी २०२४ ला वर्ष संपले तरी वर्ग-३ आणि वर्ग-४ च्या पदांसाठी अजूनही अर्ज मागविण्यात आले नाहीत.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षामध्ये राज्य शासन ७५ हजार रिक्त पदांची भरती करत आहे. विविध विभागांत पदांची भरती होत असताना नगर परिषद/ नगर पंचायतीमधील वर्ग-३ व वर्ग-४ संवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठी शासनाकडून हालचाली दिसत नाहीत. गेल्या ८ ते ९ वर्षांत या विभागात मोठ्या प्रमाणात पदे रिक्त झाली. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या कामकाजावर मोठा परिणाम जाणवत आहे. अभ्यासक्रम व शैक्षणिक अर्हता जून-जुलै महिन्यात जाहीर करण्यात आली. दोन्ही विभागातील भरती करण्याबाबत शासनाकडून आश्वस्त केले. पण, लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता जाहीर होणार असल्याने ही भरती प्रक्रिया होणार की नाही, याबाबत सुशिक्षितांमध्ये संभ्रम आहे.
उपमुख्यमंत्र्यांकडून घेतली दखल
नगरविकास विभागातील रिक्त पदांसाठी त्वरित भरती करावी, अशी मागणी राज्य शासनाकडे युवा रोजगार परिषदेचे अध्यक्ष डॉ. लक्ष्मीकांत कलमुर्गे यांनी केली. त्यांच्या मागणीची दखल घेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भरतीसंदर्भात नगरविकास विभागाचे प्रधान सचिव यांना सूचित केले आहे.