बाहेरून ५० हजारांची औषधे आणली तरी मायलेक दगावले; ३ दिवसांत २२ बालकांसह ४१ मृत्यू

By शिवराज बिचेवार | Published: October 5, 2023 06:03 AM2023-10-05T06:03:21+5:302023-10-05T06:03:52+5:30

२५ वर बालके अद्यापही अत्यवस्थ

Even though medicines worth 50,000 were brought from outside, Milek died; 41 deaths including 22 children in 3 days | बाहेरून ५० हजारांची औषधे आणली तरी मायलेक दगावले; ३ दिवसांत २२ बालकांसह ४१ मृत्यू

बाहेरून ५० हजारांची औषधे आणली तरी मायलेक दगावले; ३ दिवसांत २२ बालकांसह ४१ मृत्यू

googlenewsNext

शिवराज बिचेवार

नांदेड : येथील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात मृत्यूचे सत्र थांबता थांबेना झाले आहे. औषधे बाहेरून आणण्यासाठी गरीब कुटुंबाने तब्बल ५० हजारांचा खर्च केल्यानंतरही प्रसूतीनंतर महिला अन् नवजात अर्भक दगावले. त्यानंतर, महिलेच्या आईने रुग्णालयाच्या प्रवेशद्वारासमोर हंबरडा फोडला. ही हृदयद्रावक घटना बुधवारी घडली. बुधवारी रुग्णालयातील आणखी सहा जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे एकूण मृत्युसंख्या आता ४१ वर पोहोचली आहे. गंभीर बाब म्हणजे त्यात २२ बालकांचा समावेश आहे, तर अजूनही २५ हून अधिक बालके अत्यवस्थ आहेत.    

शनिवारी लोहा तालुक्यातील मुरंबी गावातील अंजली वाघमारे ही महिला प्रसूतीसाठी दाखल झाली होती. या महिलेची सुलभ प्रसूती झाल्यानंतर, तिने गोंडस मुलीला जन्म दिला होता. रुग्णालयात औषधे नसल्यामुळे कुटुंबाने उधारी-उसनवारी करून बाहेरून ५० हजार रुपयांची औषधे खरेदी करून आणली होती. जन्मावेळी बाळाचे वजनही चांगले होते. त्यामुळे कुटुंब आनंदात होते; परंतु, दुसऱ्या दिवशी बाळाचा मृत्यू झाला तर बुधवारी अंजलीबाई यांनीही जगाचा निराेप घेतला. ही बाब समजल्यानंतर अंजलीबाई यांच्या आईने रुग्णालय परिसरातच हंबरडा फोडला. त्यामुळे उपस्थितांचे मन हेलावून गेले.

दानशूर धावले मदतीसाठी

बाहेरून औषधे खरेदी करावी लागत आहेत. ही बाब समोर आल्यानंतर काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी चार लाखांची औषधे खरेदी करून दिली. एका फार्मा कंपनीनेही चार लाख रुपयांची औषधे रुग्णालयाला दान केली. सचखंड गुरुद्वारा बोर्डाचे चेअरमन डॉ. विजय सतबीरसिंग मदतीचा हात पुढे केला आहे.

अतिदक्षता विभागात ७२ बालके अत्यवस्थ 

शासकीय रुग्णालयातील बालरोग अतिदक्षता विभागात सध्या ७२ अत्यवस्थ बालकांवर उपचार सुरू आहेत. एका वाॅर्मरमध्ये तब्बल दोन, तर कुठे तीन बालकांना ठेवण्यात आले आहे. त्यामुळे एकमेकांचा संसर्ग होण्याचीही दाट शक्यता आहे, तर दुसरीकडे या वॉर्डसाठी तीन शिप्टमध्ये प्रत्येकी दोन परिचारिका आहेत. त्यामुळे रुग्णसेवेवर त्याचा परिणाम होत आहे.

आराेग्यमंत्र्यांच्या मतदारसंघात चिमुकलीचा उपचाराअभावी मृत्यू?

राज्याचे आराेग्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री प्रा. डाॅ. तानाजी सावंत यांचा मतदारसंघ असलेल्या भूम येथील ग्रामीण रुग्णालयात एक वर्षीय चिमुकलीचा उपचाराअभावी मृत्यू झाला. डाॅक्टर उपस्थित नसल्याने चिमुकलीला ऑक्सिजन देता आला नाही, असे नातेवाईकांचे म्हणणे आहे. संबंधित डाॅक्टरविरुद्ध कारवाई करावी, अशी मागणी करत नातेवाईक तसेच नागरिकांनी माेठी गर्दी केली हाेती. त्यामुळे तणाव निर्माण झाला होता.

राज्य सरकार व्हेंटिलेटरवर

राज्यात निव्वळ बोलघेवडेपणा सुरू आहे. पाच लाख रुपयांचे उपचार मिळणार, अशा घोषणा करण्यात येत आहेत. प्रत्यक्षात शासकीय रुग्णालयात साधी पॅरासिटेमॉलची गोळीही मिळेना झाली.  आरोग्यसेवेचा बोजवारा उडाला असून हे सरकारच व्हेंटिलेटरवर आहे.

- अंबादास दानवे, विरोधी पक्षनेते, विधान परिषद

शासकीय रुग्णालयाची अवस्था अत्यंत दयनीय आहे. एकाच दिवशी २४ मृत्यू झाल्यानंतर सरकारने त्यातून काही तरी बोध घेऊन सुधारणा करण्याची अपेक्षा होती. परंतु सरकारने अनास्था दाखविली. त्यामुळे रुग्णालयात आतापर्यंत झालेले ४१ मृत्यू हे सरकारने केलेले खूनच आहेत.

- विजय वडेट्टीवार, विरोधी पक्षनेते, विधानसभा

राज्यातील शासकीय रुग्णालयात सध्या मृत्यूतांडव सुरू आहे. यातून प्रशासनातील गैरव्यवहार, औषधांचा अपुरा साठा, डॉक्टर्स आणि इतर कर्मचाऱ्यांची रिक्त पदे अशा अनेक बाजू पुढे आल्या आहेत. अधिष्ठात्यांना शौचालय धुवायला लावणे ही बालिश कृती करून गोष्टी सुरळीत होणार नाहीत. 

       - जयंत पाटील, प्रदेशाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस

छत्रपती संभाजीनगर : नांदेड येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठात्यांना खासदारांनी रुग्णालयातील शौचालय साफ करायला लावल्याच्या प्रकाराचा बुधवारी घाटी रुग्णालयात निषेध करण्यात आला.  म‘आधी औषधे, मनुष्यबळ द्या, पायाभूत सुविधा मग बोला...’ अशा शब्दांत वैद्यकीय शिक्षकांनी रोष व्यक्त केला.

Web Title: Even though medicines worth 50,000 were brought from outside, Milek died; 41 deaths including 22 children in 3 days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nandedनांदेड