पासबुक, एटीएम नसतानाही शेतकरी महिलेची अनुदानाची रक्कम हडपली
By शिवराज बिचेवार | Published: August 19, 2023 04:24 PM2023-08-19T16:24:21+5:302023-08-19T16:24:57+5:30
या प्रकरणात शेतकरी महिलेच्या तक्रारीवरून उमरी पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे.
नांदेड : जिल्हा मध्यवर्ती बँकेचे एटीएम किंवा पासबुक खातेदाराला दिलेले नसताना त्यांच्या खात्यातून अनुदानाचे जमा झालेले १९ हजार रुपये एटीएमद्वारे काढून हडप करण्यात आले. ही घटना उमरी येथे घडली. या प्रकरणात शेतकरी महिलेच्या तक्रारीवरून उमरी पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे.
निशा विजय सोनवणे (रा. महावीर सोसायटी, नांदेड) असे फसवणूक झालेल्या महिलेचे नाव आहे. या महिलेची मौजे सावरगाव येथे शेती आहे. शेतीच्या अनुदानाची रक्कम जिल्हा मध्यवर्ती बँक शाखा उमरी येथे जमा होणार असल्यामुळे पाच वर्षांपूर्वी त्यांनी या बँकेत खाते काढले होते. या खात्यात २०२२-२३ मध्ये १९ हजार ८५६ रुपये जमा झाले होते.
परंतु सोनवणे यांच्याकडे बँकेचे पासबुक किंवा एटीएम नव्हते. त्यानंतरही अज्ञात आरोपीने लोहा तालुक्यातील किवळा येथील शाखेतून सोनवणे यांच्या खात्यातून ही रक्कम काढून घेतली. याबाबत माहिती मिळाल्यांनतर सोनवणे यांनी ठाण्यात तक्रार दिली. या प्रकरणाचा तपास सपोनि कर्हे हे करीत आहेत.