मनाच्या दालनात प्रत्येकाला दिली एैसपैस जागा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2019 12:40 AM2019-05-19T00:40:06+5:302019-05-19T00:41:20+5:30
मराठी गझलचे नाव निघाल्यानंतर सुरेश भटानंतर नाव निघते ते ईलाही जमादार यांचे. १९६४ पासून काव्यलेखन करणाऱ्या जमादार यांच्याकडे अक्षरश: शब्दसोन्याची खाण आहे. मराठी गझलेच्या तंत्र आणि शास्त्राचा विषय निघतो तेव्हाही त्यांचेच नाव पुढे येते. अशा प्रसिद्ध गझलकार ईलाही जमादार यांच्याशी साधलेला हा संवाद...
अत्यंत भावस्पर्शी कविता आणि गझल ही आपली ओळख आहे. या गझल लेखनाची सुरुवात कशी झाली?
नोकरीमुळे कुटुंबापासून दूर राहत होतो. दिवस कामामध्ये निघून जायचा. मात्र कामावरुन घरी परतल्यानंतर एकटेपणा जाणवायचा. यातूनच वाचन-लिखाणाची आवड लागली. ज्या भावना मनामध्ये उमटतात, जे अनुभव आयुष्यामध्ये येतात तेच मी शब्दबद्ध करीत गेलो. एके दिवशी माझ्या एका मित्राने हे लिखाण पाहिले आणि कविता भावस्पर्शी असल्याचे सांगितले. तेव्हाच मला माझे लिखाण कविता आहे, हे समजले.
आपणाला या लिखाणासाठी कोणाकडून मार्गदर्शन मिळाले?
मनातील भाव-भावना कागदावर उमटवित मी गझललेखन करीत गेलो. एके दिवशी डॉ. नाडकर्णी यांचा उर्दू मुशायराचा कार्यक्रम होता. तेथे गेल्यानंतर मी माझ्या हातातील कविता त्यांना दाखवित कविता वाचनाची संधी मागितली. त्यांनी सदर कार्यक्रम मुशायºयाचा असल्याचे सांगून मला घरी येवून भेटण्यास सांगितले आणि गझल लेखनाबाबत मार्गदर्शन केले.
आपले पुढील प्रकल्प काय आहेत?
गझलची १५ तर उर्दूतील एका पुस्तकाचे लिखाण झाले आहे. नवोदित मराठी कवींसाठी गझल क्लिनिक ही कार्यशाळा मी घेत असतो. गझल लेखनाकडे तरुणाई वळावी, त्यांना नेमके मार्गदर्शन मिळावे यासाठी या कार्यशाळा अधिकाधिक व्हाव्यात, असा माझा प्रयत्न असतो. यापुढेही तो राहील. जो भेटेल त्याला मनापासून आपलासा करीत गेलो. यापुढेही अनेकांना तेथे जागा मिळेल.
गझलमध्ये भावनेला महत्त्व
गझलेच्या तंत्राचा आणि शास्त्राचा विषय निघतो तेव्हा मी गझलमध्ये सर्वाधिक महत्त्व भावनेला देतो. तुमच्या मनातील भावना किती तीव्र आहेत त्यावरच लिखाणाची खोली अवलंबून असते. मी कधीही ठरवून लिहिले नाही.निसर्ग देतो आणि त्याने सांगितल्याप्रमाणे मी कागदावर उतरवित जातो. यात माझे स्वत:चे काही आहे असे मला वाटत नाही. सुरुवातीच्या लिखाणानंतर अधिकाधिक प्रगल्भता येत गेली. शब्दावरही मेहनत घेतली. त्यामुळेच या शब्दांना नजाकत मिळाल्याच्या भावनाही ईलाही जमादार यांनी व्यक्त केल्या.
प्रत्येकाच्या आयुष्यात सुख असते तसेच त्याच्या आयुष्याला दु:खाचीही किनार असते. या सुख-दु:खाकडे तुम्ही कसे पाहता ते महत्त्वाचे आहे. माझ्या बाबतीत विचाराल तर माझे दु:खच मी लेखणद्वारे कागदावर उतरवितो. ही वेदना कविता बनते आणि याच कवितेची पुढे गझल होते. -इलाही जमादार