प्रियकर बोहल्यावर अन् अचानक धडकली प्रेयसी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2019 12:43 AM2019-06-16T00:43:17+5:302019-06-16T00:44:23+5:30
सनई-चौघड्याच्या सुरात नवरदेवाचे लग्नमंडपात आगमन झाले़ अहेराच्या देवाणघेवाणीनंतर नवरदेव बोहल्यावर चढणार तोच लग्नमंडपात त्याची प्रेयसी धडकली अन् नवरदेवाचे बिंग फुटले़ त्यामुळे संतप्त झालेल्या नववधूच्या नातेवाईकांनी नवरदेवाची यथेच्छ धुलाई करीत त्याला पोलिसांच्या ताब्यात दिले़
नांदेड : सनई-चौघड्याच्या सुरात नवरदेवाचे लग्नमंडपात आगमन झाले़ अहेराच्या देवाणघेवाणीनंतर नवरदेव बोहल्यावर चढणार तोच लग्नमंडपात त्याची प्रेयसी धडकली अन् नवरदेवाचे बिंग फुटले़ त्यामुळे संतप्त झालेल्या नववधूच्या नातेवाईकांनी नवरदेवाची यथेच्छ धुलाई करीत त्याला पोलिसांच्या ताब्यात दिले़
नांदेड शहरातील कौठा भागातील एका मंगल कार्यालयात शनिवार, १५ जून रोजी सकाळी ११ वाजून ५१ मिनिटांनी याच भागातील नववधू प्रिया (नाव बदललेले) हिचा विवाह कळमनुरी तालुक्यातील दांडेगावच्या अरविंद जगदेवराव साखरे याच्याशी होणार होता़ नववधूकडील मंडळींनी लग्नाची जय्यत तयारीही केली होती़ मंगल कार्यालयात दोन्ही बाजूंची वºहाडी मंडळीही जमली होती़ पाहुण्यांच्या सरबराईत सर्वजण व्यस्त होते़ दोन्हीकडच्या पाहुण्यांना अहेराची देवाणघेवाण झाली़ थोड्याच वेळात नवरदेव अरविंद हा बोहल्यावर चढणार तोच त्याची प्रेयसी माया (नाव बदललेले) ही लग्नमंडपात येऊन धडकली़ तिने थेट नववधू प्रियाच्या कुटुंबियांना जाऊन नवरदेव अरविंद आणि माझे यापूर्वीच लग्न झाल्याचे व त्याने आपली फसवणूक केल्याची आपबिती सांगितली़ मायाच्या या धक्कादायक खुलाशाने नववधू मायाचे कुटुंबीय अवाक् झाले़ त्यानंतर नववधूच्या कुटुंबियांनी लगेच याबाबत वर अरविंद व त्याच्या कुटुंबियाला जाब विचारला़ यावेळी अरविंदने मायाशी यापूर्वी प्रेमप्रकरण होते़ परंतु, आमचे लग्न झाले नाही़ असे सांगताच नववधूच्या कुटुंबियांनी नवरदेव अरविंदची यथेच्छ धुलाई करण्यास सुरुवात केली़ काही वेळातच ही गोष्ट लग्नमंडप व परिसरात वाऱ्यासारखी पसरली़
घटनेचे गांभीर्य ओळखून नवरदेवाकडील वºहाडी मंडळींनी लग्नातून लगेच काढता पाय घेतला़ तर नववधूच्या कुटुंबियांनी नवरदेव अरविंद व त्याच्या भावाला पकडून ठेवले़ या सर्व गोंधळात नवरदेवाचे वडीलही घटनास्थळावरुन गायब झाले़ नववधूकडील संतप्त नातेवाईक नवरदेव व त्याच्यासोबतच्या नातेवाईकांना आणखी मारहाण करण्याच्या तयारीत होते़ त्याचवेळी या भागाचे नगरसेवक राजू काळे यांनी नवरदेव, त्याची प्रेयसी माया आणि नववधूच्या मोजक्या कुटुंबियांना घेवून त्यांच्या कार्यालयात घेवून गेले़ त्यामुळे जमावापासून ते बचावले व पुढील अनर्थ टळला़ या ठिकाणी काळे यांनी सर्वांचे म्हणणे ऐकून घेत ही बाब पोलिसांना कळविली़ या ठिकाणी अरविंदची प्रेयसी असलेल्या माया हिने अरविंदसोबतच्या प्रेमप्रकरणाचे पुरावे दिले़ नांदेड ग्रामीण ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले़ फसवणूक करणाºया नवरदेवाविरुद्ध ग्रामीण ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती़
नववधू प्रियाचा लावला विवाह
नियोजित वर अरविंद याच्याकडून फसवणूक झाल्यानंतर नववधूचे कुटुंबिय काळजीत पडले होते़ नववधूचे पित्याचे छत्र हरपले असून आईनेच शेती विकून तिच्या लग्नाची तयारी केली होती़ त्यामुळे सर्वजन चिंतेत होते़ तोच नववधूच्या नातेवाईकांपैकीच एका मुलाने प्रिया हिच्याशी लग्नास होकार दिला़ सायंकाळी सहा वाजता प्रियाचा त्या मुलाशी विवाह लावून देण्यात आला़ हा विवाह जुळावा यासाठी परिसरातील अनेकांनी प्रयत्न केले़