माजी ऑफीसबॉयचा कारनामा, बिल्डरच्या कार्यालयात २२ लाखांची चोरी करून तिरुपती वारी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 3, 2022 04:00 PM2022-11-03T16:00:01+5:302022-11-03T16:01:17+5:30
सन्मान कन्स्ट्रक्शनच्या कार्यालयात असलेल्या बाथरुमध्ये हवा खेळती ठेवण्यासाठी असलेल्या छोट्या खिडकीतून चोरट्याने आत प्रवेश केला होता.
नांदेड : शहरातील रेल्वेस्टेशन रस्त्यावर असलेल्या सन्मान कन्स्ट्रक्शनच्या कार्यालयातून शनिवारी रात्री २२ लाख रुपये लंपास करण्यात आले होते. या प्रकरणात एक आरोपी हा चोरीनंतर दर्शनासाठी थेट तिरुपतीला गेला होता, तर दुसरा मुदखेड येथेच थांबला होता. स्थानिक गुन्हे शाखा आणि वजिराबाद पोलिसांनी या दोघांच्याही मुसक्या आवळल्या असून, त्यांच्याकडून चोरीतील १७ लाख ४१ हजार रुपये जप्त करण्यात आले आहेत, अशी माहिती पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी दिली.
सन्मान कन्स्ट्रक्शनच्या कार्यालयात असलेल्या बाथरुमध्ये हवा खेळती ठेवण्यासाठी असलेल्या छोट्या खिडकीतून चोरट्याने आत प्रवेश केला होता. त्यानंतर सीसीटीव्ही कॅमेरे बंद करुन २२ लाख रुपये लंपास केले होते. या प्रकरणात नंदकुमार गाजुलवार यांच्या तक्रारीवरुन वजिराबाद पोलिसांनी गुन्हा नोंद केला होता. पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा आणि वजिराबाद पोलिस तपास करीत होती. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले तसेच खबऱ्यांकडून माहिती काढली. त्यात अंकुश पांडुरंग माेगले हा चोरीनंतर थेट तिरुपतीला गेला होता, तर शिवदास पूरभाजी सोनटक्के हा मुदखेड येथेच होता. पोलिसांनी दोघांनाही पकडले. त्यानंतर पोलिसांनी दोघांकडून १७ लाख ४१ हजार रुपये जप्त केले. पोनि. द्वारकादास चिखलीकर यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि. पांडुरंग माने, पोउपनि. दत्तात्रय काळे, सचिन सोनवणे, आशिष बोराटे, जसवंतसिह शाहू, संजय केंद्रे, गुंडेराव करले, गंगाधर कदम, शंकर म्हैसनवाड, सखाराम नवघरे यांच्या पथकाने ही कारवाई केली.
आरोपी वर्षभरापूर्वी होता बिल्डरकडे कामाला
आरोपी शिवदास पूरभाजी सोनटक्के हा वर्षभरापूर्वी सन्मान कन्स्ट्रक्शनच्या कार्यालयात ऑफीसबॉय म्हणून कामाला होता. परंतु नंतर त्याने हे काम सोडले. त्यामुळे कार्यालयात सीसीटीव्ही कॅमेरे कुठे लावले आहेत? रक्कम कुठे ठेवली जाते, प्रवेश कसा करायचा, याबाबत इत्यंभूत माहिती होती.