नांदेडमध्ये इंग्रजी माध्यमांच्या खाजगी शाळांचीही तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2018 12:43 AM2018-09-02T00:43:03+5:302018-09-02T00:43:29+5:30
आॅनलाईन बदली प्रक्रियेवेळी जिल्ह्यातील बंद असलेल्या शाळावर ८० शिक्षकांना नियुक्त्या मिळाल्या होत्या. या शिक्षकांचे समुपदेशनाद्वारे तातडीने समायोजन करण्याचा निर्णय शनिवारी जिल्हा परिषदेत झालेल्या शिक्षण समितीच्या बैठकीत घेण्यात आला. दरम्यान, खाजगी इंग्रजी माध्यमाच्या शाळांची तपासणी करण्याचा निर्णय घेण्यात आला असून याबाबत सर्व गटशिक्षणाधिकाऱ्यांना तशा सूचना देण्यात आल्या आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड : आॅनलाईन बदली प्रक्रियेवेळी जिल्ह्यातील बंद असलेल्या शाळावर ८० शिक्षकांना नियुक्त्या मिळाल्या होत्या. या शिक्षकांचे समुपदेशनाद्वारे तातडीने समायोजन करण्याचा निर्णय शनिवारी जिल्हा परिषदेत झालेल्या शिक्षण समितीच्या बैठकीत घेण्यात आला. दरम्यान, खाजगी इंग्रजी माध्यमाच्या शाळांची तपासणी करण्याचा निर्णय घेण्यात आला असून याबाबत सर्व गटशिक्षणाधिकाऱ्यांना तशा सूचना देण्यात आल्या आहेत.
शिक्षण सभापती माधवराव मिसाळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला जि.प. सदस्य व्यंकटराव गोजेगावकर, मंगाराणी अंबुलगेकर, लक्ष्मणराव ठक्करवाड, साहेबराव धनगे, अनिरुद्ध पाटील, ज्योत्स्ना नरवाडे, शिक्षणाधिकारी अशोक देवकरे, दत्तात्रय मठपती, यांच्यासह बंडू आमदूरकर, येरपुलवार आदींची उपस्थिती होती. आॅनलाईन बदल्यामध्ये किनवट, माहूर तालुक्यांतील शिक्षकांच्या मोठ्या प्रमाणात बदल्या झाल्या. परंतु, यातील काही बदल्या या बंद असलेल्या शाळा या ठिकाणी झाल्या. दुसरीकडे कंधार, मुखेड, देगलूर या तालुक्यांतील काही शाळांत शिक्षकांच्या रिक्त जागा असल्याने मोठ्या प्रमाणात ओरड सुरू असून तेथे शिक्षक मिळत नसल्याचे चित्र आहे. याबाबतचा मुद्दा शुक्रवारी पार पडलेल्या सर्वसाधारण सभेमध्येही उपस्थित झाला होता. त्यावर येत्या आठ दिवसांत बंद शाळांवर नियुक्त्या झालेल्या ८० शिक्षकांचा प्रश्न सोडविण्याची ग्वाही देण्यात आली होती. या अनुषंगाने शनिवारच्या शिक्षण समिती बैठकीत हा मुद्दा उपस्थित झाला. यावर शासन निर्णयानुसार इतरत्र रिक्त असलेल्या जागांवर मुख्य कार्यकारी अधिकाºयांशी चर्चा करुन समुपदेशनाद्वारे वरील ८० शिक्षकांचे समायोजन करण्याचा निर्णय घेण्यात आला.
शिक्षण समितीच्या यापूर्वीच्या बैठकीत खाजगी इंग्रजी माध्यमाच्या शाळांचा मुद्दा जि. प. सदस्य साहेबराव धनगे यांनी उपस्थित केला होता. या शाळा विद्यार्थ्यांकडून भरमसाठ शुल्क आकारत असल्याच्या तक्रारी येत आहेत. खाजगी इंग्रजी माध्यमाच्या शाळांनी दरवर्षी किती शुल्क घ्यावे, याबाबतचा शासनाचा आदेश आहे. याबरोबरच सर्व शाळांमध्ये शिक्षक-पालक समिती नियुक्त करण्यास सांगण्यात आलेले आहे. परंतु, पालक समितीच्या बैठका न घेताच मनमानी पद्धतीने विद्यार्थ्यांकडून शुल्क आकारले जात आहे. त्यामुळे या शाळांची तपासणी करण्याची मागणी धनगे यांनी केली होती. यावर सर्व गटशिक्षणाधिकाºयांना शाळा तपासणीच्या सूचना देण्यात आल्या असल्याचे शिक्षण विभागाच्या वतीने सांगण्यात आले.
अनियमिततेसंदर्भात उपसंचालकांकडे अहवाल
बिलोली तालुक्यातील बिजूर येथील प्राथमिक शाळेला ८० टक्के मान्यता असताना १०० टक्केनुसार बिले काढण्यात आले. याप्रकरणी वेतन पथकात एस.एस. राठोड व कनिष्ठ लिपिक एस.एन. देशटवार यांच्यावर नियमानुसार कार्यवाही करण्यात येणार असल्याचे शिक्षण समितीच्या मागील बैठकीत स्पष्ट करण्यात आले होते. यासंबंधीचा अहवाल पुढील कार्यवाहीसाठी शिक्षण उपसंचालकांकडे पाठविला आला असून त्यांच्या निर्देशानुसार कारवाई करण्यात येणार आहे.
ंसरस्वती प्राथमिक शाळेची चौकशी सुरू
बळीरामपूर येथील सरस्वती प्राथमिक शाळेने मागील कालावधीमध्ये शिक्षकांची वैयक्तिक मान्यता आणल्याचे प्रकरण पुढे आले होते. तत्कालीन शिक्षणाधिकारी मढावी यांच्या काळातील हा बोगस प्रकार लक्षात आल्यानंतर पे युनिटने सदर शिक्षकांना काही वेतन दिले तर काही वेतन थांबविले होते. याबाबतचा मुद्दाही शिक्षण समितीच्या मागील बैठकीत उपस्थित झाला होता. या प्रकरणाची चौकशी सुरू करण्यात आल्याचे शिक्षण समितीने स्पष्ट केले आहे.