नांदेड जिल्ह्यातील पर्जन्यमापक यंत्रांची तपासणी सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2019 12:16 AM2019-05-31T00:16:23+5:302019-05-31T00:17:42+5:30
जिल्ह्यातील महसूल मंडळस्तरावर स्थापित केलेल्या सर्व पर्जन्यमापक यंत्राचा आढावा घेण्याचे मोहीम २८ मे पासून सुरू झाली असून गत दोन दिवसांत १८ पर्जन्यमापक यंत्राची तपासणी करण्यात आली़
नांदेड : जिल्ह्यातील महसूल मंडळस्तरावर स्थापित केलेल्या सर्व पर्जन्यमापक यंत्राचा आढावा घेण्याचे मोहीम २८ मे पासून सुरू झाली असून गत दोन दिवसांत १८ पर्जन्यमापक यंत्राची तपासणी करण्यात आली़
जिल्हाधिकारी अरुण डोंगरे व भारतीय हवामान विभागाच्या अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली एक पथकही स्थापन करण्यात आले असून या पथकाने २८ मे रोजी कुंडलवाडी, बिलोली, धर्माबाद करखेली व जारीकोट तसेच २९ मे रोजी नांदेड येथील सात पर्जनमापक यंत्रासह विष्णूपुरी, पावडेवाडी, भोकर, किनी, पाळज, अर्धापूर, दाभड व मालेगाव येथील पर्जन्यमापक यंत्राची तपासणी केली़ महसूल मंडळातील सर्व पर्जन्यमापक यंत्र जागतिक हवामान निकषाप्रमाणे आहे की नाही, याची तपासणी केली जात आहे़ जी यंत्रे सुुस्थितीत अथवा नादुरुस्त आहेत, ती दुरुस्त करण्याच्या सूचना पथकाकडून देण्यात येत आहेत़ पर्जन्यमापक यंत्राची देखभाल, पावसाची मोजमाप, त्याची योग्य पद्धत, संभाव्य चुका आदींबाबतची माहिती संबंधित पर्जन्य मोजणाºया कर्मचाºयाला देण्यात येत आहे़ भारतीय हवामान खात्याचे मॅट्रॉलॉजिस्ट ए.एम. पांडे, नांदेडचे हवामान निरीक्षक बी.एम. कच्छवे यांचा या पथकात समावेश आहे. पथकात अव्वल कारकून सुरेश पेदेवाड, लिपिक शंकर मगडेवार आणि विजय येमेकर यांचाही समावेश आहे.
पर्जन्यमापकावरील चुकीच्या नोंदीमुळे शासनाला आणेवारी काढताना अडचणी येत आहेत़ पावसाच्या चुकीच्या नोंदीमुळे शासनाचे नियोजन कोलमडत आहे़ त्यासाठी पर्जन्याची शास्त्रीय पद्धतीने नोंद होण आवश्यक आहे़ अनेक मंडळातील पर्जन्यमापक यंत्राची दुरवस्था झाली आहे़ काही ठिकाणी पर्जन्यमापक बंद आवस्थेत आहेत़ तर काही ठिकाणी चुकीच्या पद्धतीने पावसाच्या नोंदी घेतल्या जातात़ पर्जन्यमापक मोकळ्या जागेत आहे का, पर्जन्यमापक प्रमाणित आहे का, पाऊस मोजता येतो का, आदींची चौकशी पथकाकडून होत असल्याची माहिती हवामान निरीक्षक बालासाहेब कच्छवे यांनी दिली़ विशेष म्हणजे संपूर्ण राज्यात नांदेड जिल्ह्यातच पर्जन्यमापक यंत्रांची पावसाळापूर्व तपासणी केली जात असल्याचेही कच्छवे यांनी सांगितले़