खदानीतून अधिकचे दगड उत्खनन करणाऱ्या ठेकेदारास पावणेआठ कोटींच्या दंडाची नोटीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2022 01:57 PM2022-03-14T13:57:08+5:302022-03-14T13:57:46+5:30
कंपनीने जास्तीचे दगड उत्खनन करून शासनाचा महसूल बुडवला
उमरी : तालुक्यातून जाणाऱ्या दोन राज्य महामार्गांवरील ठेकेदारांना खदानीतून अधिकचे दगड उत्खनन केल्याप्रकरणी दंडाची नोटीस बजावण्यात आल्याची माहिती तहसीलदार माधव बोथीकर यांनी दिली.
हदगाव ते लोहगावपर्यंत जाणाऱ्या राज्य महामार्गावरील काम करणाऱ्या कल्याण टोल कंपनी यांना महसूल विभागाने उमरी तालुक्यातील वाघाळा येथील गट क्रमांक ६७ मधील क्षेत्र २.३४ येथून व वाघाळा येथील गट क्रमांक ६१ मधील क्षेत्र ०.७४ या दोन ठिकाणांहून दगड उत्खनन करण्याची परवानगी दिली होती. पण या कंपनीने जास्तीचे दगड उत्खनन करून शासनाचा महसूल बुडवण्याचा प्रयत्न केला. यासंदर्भात महसूल विभागाने उपअधीक्षक भूमी अभिलेख उमरी यांच्याकडून एटीएस मोजणी करून घेतली. या मोजणीत ४२.२५४ ब्रास व दुसऱ्या गटातून ९३३९३ अतिरिक्त जास्त दगड उत्खनन केल्याचा अहवाल प्राप्त झाल्यावर दोन ठिकाणच्या जास्तीचे उत्खनन केल्याप्रकरणी केटीआय कंपनीला ६ कोटी १३ लाख १२ हजार ४४४ रुपये दंडाची नोटीस बजावण्यात आली.
तसेच मुदखेड ते कंदकुर्ती रस्त्याच्या कामासाठी शारदा कन्स्ट्रक्शन कंपनीला तालुक्यातील हुंडा तांडा येथील गट क्रमांक ६ मधील १.१८ क्षेत्रातून दगड उत्खनन करण्याची परवानगी दिली होती. मात्र या ठिकाणी कंपनीने जास्तीचे उत्खनन केले. याची एटीएसद्वारे मोजणी करण्यात आली होती. या मोजणीत २५८४८.०५ ब्रास दगड अतिरिक्त उत्खनन केल्याप्रकरणी कंपनीस १ कोटी ७३ लाख ६९ हजार ८८९ रुपये दंडाची नोटीस बजावण्यात आली आहे. या नोटिसीद्वारे संबंधित कंपन्यांना दंड भरण्यासाठी एक महिन्याची मुदत देण्यात आली. या काळात दंड भरण्याचे कायद्यात प्रावधान आहे. दंड न भरल्यास पुढील कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल, अशी माहिती तहसीलदार माधव बोथीकर यांनी दिली.