दुष्काळग्रस्त मराठवाड्यासाठी कोकणचे पाणी : रामदास कदम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2019 06:49 PM2019-08-17T18:49:14+5:302019-08-17T18:52:05+5:30
मराठवाड्यास मोठा दिलासा देणारा निर्णय
नांदेड : मराठवाड्यात सातत्याने दुष्काळाची परिस्थिती निर्माण होत असून यासाठी कोकणमधून पाणी देण्याचा निर्णय राज्य शासनाने नुकताच घेतला आहे. या निर्णयामुळे मराठवाड्यास मोठा दिलासा ठरणार आहे, असे प्रतिपादन पर्यावरण तथा जिल्ह्याचे पालकमंत्री रामदास कदम यांनी केले.
स्वातंत्र्य दिनाच्या ७२ व्या वर्धापन दिनानिमित्त मुख्य शासकीय समारंभात पालकमंत्री कदम यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. यावेळी कदम म्हणाले, अनेकांच्या बलिदानातून स्वातंत्र्य मिळाले असून आम्ही सारे भारतीय एक आहोत़ असे स्पष्ट करुन स्वातंत्र्यदिनी आज पहिल्यांदा जम्मू काश्मीरमध्ये भारताचा तिरंगा फडकत आहे. याचा सर्व भारतीयांना अभिमान आहे़ राज्यात सांगली, कोल्हापूर, सातारा येथे अतिवृष्टी झाली़ तर आज मराठवाडा तहानलेला आहे. मराठवाड्यावर निसर्गाची अवकृपा होत असून शेतकरी आकाशाकडे डोळे भरुन पाहत आहेत. कोकणमधून मराठवाड्याला पाणी देण्याच्या निर्णयाबाबत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे त्यांनी आभार मानले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात उत्साहात राष्ट्रध्वज वंदनाचा कार्यक्रम झाला. या समारंभात जि़ प़ अध्यक्षा शांताबाई पवार, महापौर दीक्षा धबाले, खा़ प्रताप पाटील चिखलीकर, जिल्हाधिकारी अरुण डोंगरे, विशेष पोलीस महानिरीक्षक प्रकाश मुत्याल, मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक काकडे, आयुक्त लहुराज माळी, पोलीस अधीक्षक संजय जाधव, अप्पर पोलीस अधीक्षक दत्तराम राठोड यांची उपस्थिती होती़
शहर व ग्रामीण भागात जलपुनर्भरण गरजेचे
जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात पावसाचे पाणी जमिनीत साठवण्याचा जलपुनर्भरणाचा उपक्रम जिल्हा प्रशासनाने हाती घेतला आहे. हा उपक्रम जिल्हाधिकारी कार्यालय परिसरापुरता मर्यादीत न राहता शहरी, ग्रामीण भागात हा उपक्रम राबविला पाहिजे. यासाठी सर्वांनी प्रयत्न केल्यास आपण दुष्काळाशी सहज सामना करु शकतो. असेही कदम म्हणाले़