अतिरिक्त रजा वाहक महिलांनाच; इतर महिला कर्मचार्यांना वगळले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2018 08:22 PM2018-03-27T20:22:51+5:302018-03-27T20:22:51+5:30
सहा महिन्यांच्या प्रसूती रजेसोबतच ३ महिन्यांची रजा देण्याचे मंजूर केले आहे़ या निर्णयामुळे महिला वाहकांना दिलासा मिळाला़ परंतु, यांत्रिकीसह इतर विभागात काम करणार्या महिलांना यातून वगळल्याने त्यांच्यावर अन्याय झाल्याची भावना काही कर्मचार्यांनी बोलून दाखविली़
- श्रीनिवास भोसले
नांदेड : कर्तव्यावर असणार्या महिला वाहकांचे झालेल्या गर्भपाताचा मान्यताप्राप्त संघटनेने मुद्दा पुढे आणला़ यानंतर जाग आलेल्या महामंडळाने २३ मार्च रोजी परिपत्रक काढूून महिला वाहकांना सहा महिन्यांच्या प्रसूती रजेसोबतच ३ महिन्यांची रजा देण्याचे मंजूर केले आहे़ या निर्णयामुळे महिला वाहकांना दिलासा मिळाला़ परंतु, यांत्रिकीसह इतर विभागात काम करणार्या महिलांना यातून वगळल्याने त्यांच्यावर अन्याय झाल्याची भावना काही कर्मचार्यांनी बोलून दाखविली़
महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेच्या राज्य महिला संघटक व केंद्रीय उपाध्यक्षा शीला संजय नाईकवाडे यांनी २०१५ मध्ये संपूर्ण महाराष्ट्रातून महिला कामगारांकडून प्रश्नावलीच्या माध्यमातून त्यांचे प्रश्न, समस्या जाणून घेतल्या़ दरम्यान, या सर्वेक्षणातून गरोदर महिला वाहक कर्तव्यावर असताना होणार्या गर्भपाताची धक्कादायक आकडेवारी समोर आली़ सदर महिती त्यांनी प्रशासनाकडे दाखल केली़ यानंतर प्रसार- माध्यमांनी या विषयाला वाचा फोडली़ यावेळी गर्भपात झालेल्या अनेक महिला वाहकांनी निर्भीडपणे समोर येवून आपल्या समस्या मांडल्या़ या सर्व घडामोडीनंतर खडबडून जागे झालेल्या प्रशासन व एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी एसटी महामंडळातील सर्व महिला कामगारांना सहा महिने प्रसूती रजेसह तीन महिने अतिरिक्त पगारी प्रसूती रजेची घोषणा केली. परंतु, यासंदर्भात परिपत्रक काढण्यात आले नव्हते़ दरम्यान, निर्भया समिती कामगार संघटनेच्या पाठपुराव्यामुळे याबाबत प्रशासनाने २३ मार्च रोजी परिपत्रक प्रसारित केले़ परंतु, या परिपत्रकात केवळ महिला वाहकांना तीन महिने अतिरिक्त रजा मंजूर करण्यात येईल, असे सुचित केले आहे़ परंतु, यांत्रिकी विभागात अवजड वस्तू हाताळत काम करणार्या महिलांना यातून वगळले आहे़ महिला वाहकांबरोबर इतर कर्मचार्यांचा यात समावेश करण्याची मागणी होत आहे़
ठराविक महिन्यापर्यंत बैठे काम
महिला वाहकांना सेवेत लागल्यापासून या परिपत्रकाचा लाभ मिळणार असून दोन अपत्यासाठी या अतिरिक्त रजांचा लाभ घेता येईल. सहा महिने प्रसूती रजेसोबतच सदर महिला वाहकाला ३ महिने अतिरिक्त प्रसूती रजा मिळणार आहे. गरोदर महिला वाहकाला गरोदरपणाच्या कालावधीत पहिल्या चार महिन्यांपर्यंत मानसेवी वैद्यकीय अधिकारी व स्त्रीरोग तज्ज्ञांच्या प्रमाणपत्राच्या आधारे बैठे काम देण्यात येणार असून गरोदरपणाच्या काळात ठराविक महिन्यापर्यंत सुरक्षित, सुस्थितीत मार्गावर कामगिरी देण्याच्या सूचना आगार व्यवस्थापकांना दिल्या आहेत़
इतर महिला कर्मचार्यांवर अन्याय
महिला वाहकांना अतिरिक्त तीन महिने रजा देण्याच्या निर्णयामुळे महाराष्ट्र एस़ टी़ कामगार संघटनेने उभारलेल्या लढ्याला यश मिळाले़ परंतु महिला मेकॅनिक व इतर महिला कामगारांना यातून वगळल्यामुळे हा त्यांच्यावर अन्याय झाला असून परिवहनमंत्री यांनी सर्व महिला कर्मचार्यांसाठी केलेल्या घोषणेचा त्यांना विसर पडल्याची टीका एसटी कामगार संघटनेच्या राज्य महिला संघटक शीला संजय नाईकवाडे यांनी केली़ तर महिला वाहकाबाबत घेतलेल्या निर्णयाचे स्वागत करून इतर महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी लढा सुरूच राहील, असेही नाईकवाडे यांनी सांगितले़