नांदेड जिल्ह्यातील नऊ महसूल मंडळात अतिवृष्टी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2020 07:47 PM2020-08-17T19:47:24+5:302020-08-17T19:52:49+5:30
जिल्ह्यात मागील २४ तासांत सरासरी २५़०९ मिमी पावसाची नोंद झाली असून संततधार पावसाने खरीप पिकांचे नुकसान होत आहे.
नांदेड : जिल्ह्यात रविवारी सर्वदूर दमदार स्वरुपाचा पाऊस झाला़ किनवट तालुक्यासह ९ महसूल मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली आहे़ जिल्ह्यात मागील पाच दिवसांपासून पावसाची संततधार सुरु आहे. त्यामुळे अनेक भागात मागील तीन ते चार दिवस सूर्यदर्शनही झालेले नाही़
रविवारी नांदेडसह जिल्ह्यातील विविध भागांत दिवसभर पावसाची रिपरिप सुरू होती़ रविवारी रात्रीही अनेक ठिकाणी जोरदार पावसाने हजेरी लावली़ किनवटसह माहूर, हदगाव आणि भोकर तालुक्यात पावसाचा जोर मोठा होता़ सोमवारी सकाळी ८ वाजता वाजेपर्यंत किनवट तालुक्यातील बोधडी ६५़५० मिमी, इस्लापूर ६५़५०, जलधारा ६५़५०, शिवणी ७२, मांडवा ६५़५० मिमी आणि दहेली मंडळातही ६५़५० मिमी पावसाची नोंद झाली. तर भोकर तालुक्यातील मातूळ मंडळात ६५़५० मिमी, हदगाव तालुक्यातील मनाठा मंडळात ६७ मिमी आणि माहूर तालुक्यात सिंदखेड मंडळात ६५़५० मिमी पावसाची नोंद झाली. जिल्ह्यात मागील २४ तासांत सरासरी २५़०९ मिमी पावसाची नोंद झाली असून संततधार पावसाने खरीप पिकांचे नुकसान होत आहे. मूग, उडिदाच्या शेंगांना पावसाने मोड फुटत आहे. तसेच सोयाबीनची पानेही पिवळी पडत आहेत. यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
किनवट-माहूर राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक ठप्प
किनवट-माहूर तालुक्यात पडत असलेल्या संततधार पावसाने अनेक नाल्यांचा संगम असलेल्या घोटी नाल्याला पूर आल्याने किनवट माहूर या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १६१ ए वरील पुलाचा वळणरस्ता वाहून गेला़ त्यामुळे हा मार्ग पुन्हा २६ दिवसांनंतर ठप्प झाला आहे़ हा मार्ग बंद झाल्याने दुचाकीस्वारांना कोल्हापुरी बंधाऱ्याच्यावरून जावे लागणार आहे तर चारचाकी वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे़ हा पूल वाहून पुलावरील वळणरस्ता वाहून गेल्याने पोळा सणाच्या बाजारासाठी आलेल्या नागरिकांना घोटीवरून पायी चालत जावे लागले तर किनवटला आलेल्या वाहनांची रस्त्याअभावी कोंडी झाली आहे़
हदगाव-भोकर वाहतूकही दोन दिवसापासून बंद.
तामसा नदीवरील पर्यायी पूल रविवारच्या मुसळधार पावसामुळे वाहून गेल्याने हदगाव व भोकर या दोन तालुक्यांची वाहतूक दोन दिवसांपासून ठप्प झाली आहे. तामसा परिसरात रविवारी दिवसभर पावसाची संततधार होती. यामुळे तामसा नदीला मोठा पूर आला़ नदीवरील नव्या पुलाचे बांधकाम चालू असून वाहतुकीच्या सोयीसाठी तात्पुरता पर्यायी नळकांडी पूल उभारण्यात आला होता. परंतु, पुलाची एका बाजू पूर्णत: खरडून गेल्यामुळे हदगाव ते भोकर हा वाहतुकीचा मार्ग बंद झाला आहे. सोमवारी दोन्ही बाजूने वाहने मोठ्या प्रमाणात अडकली होती. पोळा सणाच्या आदल्याच दिवशी पूल वाहून गेल्याचा फटका तामसा भागातील पंधरा ते वीस गावांतील नागरिक व ग्राहकांना बसला आहे.
विष्णूपुरीचा दरवाजा उघडला
विष्णूपुरी प्रकल्पाच्या वरील भागातून पाण्याचा येवा सुरू असल्यामुळे रविवारी रात्री प्रकल्पाचा एक दरवाजा उघडण्यात आला आहे़ त्यातून ४३६ क्यूमेक्स वेगाने गोदावरीत विसर्ग सुरू करण्यात आला आहे़ वरच्या भागात असलेल्या पूर्णा नदीवरील येलदरी आणि सिद्धेश्वर धरण १०० टक्के भरले आहे़ या दोन्ही धरणांतून २१६ क्यूमेक्स वेगाने पाणी विष्णूपुरीत दाखल होत आहे़