एक्साईजने बनावट दारुचा साठा पकडला, आठ लाखाचा मुद्देमाल जप्त
By शिवराज बिचेवार | Published: September 13, 2022 06:27 PM2022-09-13T18:27:03+5:302022-09-13T18:27:17+5:30
नांदेड - अर्धापूर रस्त्यावर पिंपळगाव शिवारात कारमधून विक्रीसाठी परराज्यातील बनावट दारु नेण्यात येत होती. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने त्या ...
नांदेड- अर्धापूर रस्त्यावर पिंपळगाव शिवारात कारमधून विक्रीसाठी परराज्यातील बनावट दारु नेण्यात येत होती. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने त्या ठिकाणी धाड मारुन दारुसह ८ लाख २९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई ८ सप्टेंबर रोजी करण्यात आली.
मॅकडॉवेल नंबर १, इम्पिरियल ब्ल्यू या कंपनीसह देशी दारुचा बनावट साठा विक्रीसाठी नेण्यात येत होता. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने पिंपळगाव परिसरात एम.एच.२४, एएफ १४९७ या क्रमांकाची ही कार अडविली. त्याची झडती घेतली असता, त्यात ७६ हजार रुपयांचे विदेशी मद्य, ३६ हजारांची बनावट विदेशी दारु, ३ हजार ३६० रुपयांची बनावट देशी दारु आढळून आली. एक्साईजने यावेळी सुर्याप्रकाश रामराव आत्राम रा.वैभव नगर, लातूर, शेख रसूल यासीन रा.लातूर आणि केरबा रामजी पूयड रा.मिनकी ता.बिलोली या तिघांना अटक केली.
त्यांना तीन दिवसांची कोठडी सुनावण्यात आली होती. कोठडी दरम्यान त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीवरुन दारुच्या बाटल्यावर लावण्यात येणारे बनावट लेबल तसेच बुच जप्त करण्यात आले. ही कारवाई निरिक्षक एम.ए.पठाण, दुय्यम निरिक्षक अनिल पिकले, राजकिरण सोनवणे, ज्योती गुट्टे, बालाजी पवार, गणेश रेनके, प्रविण इंगोले, विकास नागमवाड यांच्या पथकाने केली.