म्युकरमायकोसिसवरील खर्च किमान आठ लाख, शासनाची मदत केवळ दीड लाखांची
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2021 04:18 AM2021-05-21T04:18:58+5:302021-05-21T04:18:58+5:30
कोविडवर मात केलेल्या आठ ते दहा टक्के रुग्णांना म्युकरमायकोसिस हा आजार होत आहे. यामध्ये अनेकांना हा बुरशीजन्य आजार होऊन ...
कोविडवर मात केलेल्या आठ ते दहा टक्के रुग्णांना म्युकरमायकोसिस हा आजार होत आहे. यामध्ये अनेकांना हा बुरशीजन्य आजार होऊन आपले अवयव, तर काहींना आपले प्राणही गमवावे लागले आहेत. कोरोनाबरोबर रुग्णाच्या अवयवांवर बुरशीचा ससंर्ग होत आहे. हा संसर्ग रोखण्यासाठी इम्युनोसिन अल्फा, फुप्फुसांची कार्यक्षमता वाढवून प्राणवायूची पातळी वाढविण्यासाठी दिले जाणारे ॲक्टेम्रा औषधांसह रक्त पातळ करणाऱ्या लो मॉलिक्युलर हिटरीन, एम्पोटेरिसीन बी, फोटॉनसारख्या अँटिफंगस औषधांचीही मागणी वाढली असल्याचे औषध विक्रेत्यांकडून सांगण्यात येत आहे. बुरशीजन्य संसर्ग रोखण्यासाठी महागडी औषधी लागतात. ही औषधी शासनाकडून उपलब्ध करून दिली जात आहेत. परंतु, खासगी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णांना लाखो रुपये खर्च करावे लागत आहेत.
कोरोनानंतर गाल तसेच डोळा सुजल्याने सिटीस्कॅन करून तपासणी केली असता म्युकरमायकोसिस असल्याचे सांगण्यात आले. परंतु, शासकीय रुग्णालयातील डॉक्टरांनी धीर देत उपचार सुरू केल्याने आमचा रुग्ण या आजारातून बाहेर पडला आहे. मात्र, छातीत इन्फेक्शन असल्याने त्याच्यावर काेविड वाॅर्डात उपचार सुरू आहेत.
- सुधाकर वारे, रुग्ण नातेवाईक
काेविडनंतर अचानक घसा सुजला आणि त्यानंतर डोळ्यावरही सूज आल्याने दवाखान्यात दाखल केले. या आजारावर येथे उपचार होत नाही, असे सांगितल्यानंतर रुग्ण औरंगाबादला हलविण्यात आला. परंतु, साडेचार लाख रुपये खर्चूनही रुग्णाचे प्राण वाचवू शकलो नाही. म्युकरमायकोसिसमध्ये डोळा गमावल्याने त्यावर शस्त्रक्रियाही करण्यात आली होती. - सदानंद अडबलवार, रुग्ण नातेवाईक.