फाळणीचे दु:ख साहित्यातून अभिव्यक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2019 12:23 AM2019-02-12T00:23:43+5:302019-02-12T00:24:12+5:30
भारताची १९४७ मध्ये झालेली फाळणी ही जगातील मोठी शोकांतिका आहे. त्याच्या जखमा अजूनही भरलेल्या नाहीत. फाळणीचे दु:ख खऱ्या अर्थाने विविध भारतीय भाषांतील कथांमधून परिणामकारकरित्या अभिव्यक्त झाले आहे, असे प्रतिपादन हिंदी साहित्यिक डॉ. नरेंद्र मोहन यांनी केले.
नांदेड : भारताची १९४७ मध्ये झालेली फाळणी ही जगातील मोठी शोकांतिका आहे. त्याच्या जखमा अजूनही भरलेल्या नाहीत. फाळणीचे दु:ख खऱ्या अर्थाने विविध भारतीय भाषांतील कथांमधून परिणामकारकरित्या अभिव्यक्त झाले आहे, असे प्रतिपादन हिंदी साहित्यिक डॉ. नरेंद्र मोहन यांनी केले.
येथील नरहर कुरुंदकर प्रतिष्ठान, रुपवेध ग्रंथालय व स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या वतीने आयोजित नरहर कुरुंदकर व्याख्यानमालेचे पहिले पुष्प गुंफताना ‘विभाजन : हिंदी और उर्दू कथा का विशेष संदर्भ’ या विषयावर ते बोलत होते. स्वारातीम विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. उद्धव भोसले यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. डॉ. मोहन म्हणाले, इंग्रजांनी फाळणीची प्रक्रिया नको तितक्या घाईगडबडीत घडवून आणली़ बाधित होणाºया लोकांना फाळणीबाबत अंधारात ठेवण्यात आले. इतके की, लाहोरच्या रहिवाशांना १४ आॅगस्ट १९४७ पर्यंत आपले शहर भारतात की पाकिस्तानात हे माहीत नव्हते. फाळणीमुळे झालेल्या भीषण नरसंहारात प्रेम, दया, शांती यासारखी मूल्येही भस्मसात झाली. यामुळेच कदााचित फाळणी ही एक मोठी चूक होती, असे अनेक साहित्यिकांना वाटले.
सआदन हसन मंटो, इब्ने इंशा, इस्मत चुगताई, गुलजार, भीष्म सहानी आदी फाळणी प्रत्यक्षपणे भोगलेल्या कथाकारांनी आपल्या साहित्यात फाळणीचे भीषण वास्तव प्रत्ययकारीपणे उभे केले आहे. फाळणी प्रत्यक्षात न पाहिलेल्या पिढीतील लेखकांनीही या विषयावर विपुल प्रमाणात कथा लिहिल्या आहेत. यावरुन फाळणीच्या दाहक स्मृती भारतीय समाज विसरलेला नाही, असेही ते म्हणाले.