भाजपाचा बंडखोरांना दणका; पक्षादेश न पाळणाऱ्या नांदेडच्या पाच जणांची हकालपट्टी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 6, 2024 11:22 AM2024-11-06T11:22:48+5:302024-11-06T11:27:14+5:30
पक्षादेश न पाळल्यामुळे भाजपकडून ४० जणांची हकालपट्टी; नांदेडच्या पाच जणांचा समावेश
नांदेड : पक्षाचा आदेश न पाळल्यामुळे भाजपाने राज्यातील ४० जणांची पक्षातून हकालपट्टी केली आहे. यामध्ये सर्वाधिक पाच जण नांदेड जिल्ह्यातील आहेत. विधानसभेच्या निवडणूक आखाड्यात महायुतीसह महाविकास आघाडीमध्ये देखील बंडखोरी उफाळली आहे. नांदेडमध्ये भाजपसह शिंदे सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी बंडखोरी करत निवडणूक रिंगणात कायम राहण्याचा निर्णय घेतला. परंतु या बंडखोरांच्या अपक्ष उमेदवारीमुळे महायुतीच्या उमेदवाराचे नुकसान होऊ शकते. त्यामुळे पक्षश्रेष्ठींनी बंडखोरांना उमेदवारी मागे घेण्याचे आवाहन करत त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न देखील केला. परंतु पक्ष आदेश न पाळता नांदेड उत्तरसहनांदेड दक्षिणमध्ये पाच जणांनी अपक्ष उमेदवारी कायम ठेवली. त्यामुळे भाजपने या पाच जणांची पक्षातून हकालपट्टी केली आहे.
भाजपा हा शिस्तीचा पक्ष असून आपण पक्षाची शिस्तभंग केली असल्याचा ठपका ठेवत त्यांच्यावर सदर कारवाई करण्यात आल्याचे पत्रात म्हटले आहे.नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघातील मिलिंद देशमुख, वैशाली देशमुख यांच्यासह नांदेड दक्षिण मधील दिलीप कंदकुर्ते सुनील मोरे आणि संजय घोगरे या पाच जणांचा समावेश आहे.
बंडखोरीनंतरही मिळाले होते प्रमोशन
भाजपचे विद्यमान महानगर अध्यक्ष दिलीप कंदकुर्ते यांनी बंडखोरी करत नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवारी कायम ठेवली आहे. मागील 2019 च्या निवडणुकीत कंदकुर्ते यांनी बंडखोरी केली होती. त्यामुळे शिवसेनेच्या राजश्री पाटील यांचा पराभव झाला होता. परंतु त्यानंतरही पक्षाने त्यांच्यावर महानगर अध्यक्ष पदाची जबाबदारी दिली होती. बंडखोरीनंतरही प्रमोशन मिळाल्याने कंदकुर्ते यांनी या निवडणुकीत पक्षादेश पाळला नसावा, अशी चर्चा भाजप वर्तुळात सुरू होती. मात्र, यावेळी भाजपने कारवाई करत त्यांची हकालपट्टी केली आहे.
भाजप पदाधिकाऱ्यावरही राहणार 'वॉच'
नांदेड दक्षिण आणि नांदेड उत्तर मध्ये भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी केलेली बंडखोरी पाहता त्यांच्या निवडणूक प्रचारात कोणकोणते पदाधिकारी सक्रीय राहतात, यावर देखील भारतीय जनता पक्षाकडून लक्ष ठेवले जाणार आहे. महायुतीच्या विरोधात काम करणाऱ्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांवर थेट शिस्तभंग आणि हकालपट्टीची कारवाई केली जाणार असल्याचा इशारा देखील पक्षश्रेष्ठींनी दिला आहे.