हमसफर, एलटीटी-मुंबई एक्स्प्रेसला वाढविला एसी डबा; प्रवाश्यांची जनरल डब्यांची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2023 03:31 PM2023-04-17T15:31:02+5:302023-04-17T15:32:55+5:30
दमरेच्या नांदेड विभागाने याबाबत प्रसिद्धपत्रक काढल्यानंतर मराठवाडा रेल्वे प्रवासी महासंघ तसेच सदस्यांनी रेल्वे प्रशासनाच्या या निर्णयाचा निषेध केला.
परभणी : नांदेड-जम्मूतावी हमसफर एक्स्प्रेस आणि नांदेड - लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई एक्स्प्रेस या दोन्ही रेल्वेत कायमस्वरूपी एक तृतीयश्रेणी वातानुकूलित डबा वाढविण्यात आला आहे. याबाबतचे प्रसिद्धीपत्रक दमरेच्या नांदेड विभागाने शनिवारी काढले आहे.
रेल्वे क्रमांक (१२७५१) नांदेड-जम्मूतावी हमसफर एक्स्प्रेसमध्ये २१ एप्रिलपासून तृतीयश्रेणी वातानुकूलित डबा वाढविण्यात आला आहे. तसेच (१२७५२) जम्मूतावी-नांदेड एक्स्प्रेसमध्ये २३ एप्रिलपासून हा डबा वाढविण्यात आला आहे. (०७४२६) नांदेड- लोकमान्य टिळक टर्मिनस एक्स्प्रेसमध्ये २४ एप्रिलपासून तर परतीच्या प्रवासात (०७४२७) एलटीटी मुंबई-नांदेड एक्स्प्रेसमध्ये २५ एप्रिलपासून हा तृतीयश्रेणी डबा वाढविला आहे. त्याचबरोबर रेल्वे क्रमांक (०७४२८) नांदेड-एलटीटीमध्ये २६ एप्रिलपासून तर (०७४२९) एलटीटी मुंबई-नांदेड एक्स्प्रेसमध्ये २७ एप्रिलपासून हा तृतीयश्रेणी वातानुकूलित डबा वाढविण्यात आला आहे. या दोन्ही रेल्वे पूर्णा, हिंगोली, वाशिम, अकोलामार्गे धावतात.
प्रवासी संघटनेकडून नाराजी
दमरेच्या नांदेड विभागाने याबाबत प्रसिद्धपत्रक काढल्यानंतर मराठवाडा रेल्वे प्रवासी महासंघ तसेच सदस्यांनी रेल्वे प्रशासनाच्या या निर्णयाचा निषेध केला. प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता व वाढती मागणी पाहता वातानुकूलित डब्यांपेक्षा सर्वसाधारण डबे रेल्वे गाड्यांना जोडावेत, अशी मागणी प्रवाशांकडून समाजमाध्यमावर करण्यात आली आहे.