नांदेड जिल्ह्यातील 8 तालुक्यात अतिवृष्टी; माहूरमध्ये 188 मिमी पावसाची नोंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2018 11:33 AM2018-08-17T11:33:05+5:302018-08-17T11:36:33+5:30
जिल्ह्यात मागील 24 तासात 8 तालुक्यात अतिवृष्टी झाली आहे.
नांदेड : जिल्ह्यात मागील 24 तासात 8 तालुक्यात अतिवृष्टी झाली आहे. माहूर तालुक्यात 24 तासात तब्बल 188 मि मी पावसाची नोंद झाली. तर किनवट तालुक्यात 133 मि मी, नांदेड 113, अर्धापूर 102, हदगाव 90, हिमायतनगर 86, मुदखेड 79 आणि भोकर तालुक्यात 66 मि मी पावसाची नोंद झाली आहे. या आठ तालुक्यासह जिल्ह्यातील 41 मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली आहे. जिल्ह्यात सरासरी 71.86 मि मी पाऊस झाला आहे.
नांदेड मधील विष्णुपुरी प्रकल्पात 90 टक्के जलसाठा उपलब्ध झाला आहे. प्रकल्पाचा एक दरवाजा गुरुवारी मध्यरात्री उघडला तर एक दरवाजा शुक्रवारी सकाळी उघडण्यात आला. मुदखेड तालुक्यातील आमदुरा येथील उच्च पातळी बंधाराही 100 टक्के भरल्याने बंधाऱ्याचे दरवाजेही उघडण्यात आल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली. गोदावरी नदीकाठच्या गावाना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
नांदेड महापालिका आणि जिल्हा प्रशासनाच्यावतीने सतर्कतेचा इशारा दिला आहे. नियंत्रण कक्षही स्थापन केल्याची माहिती जिल्हाधिकारी अरूण डोंगरे व महापालिका आयुक्त लहुराज माळी यांनी दिली. गुरुवारीही जिल्ह्यात नांदेड, अर्धापूर, किनवट, माहूर, हदगाव आणि हिमायतनगर तालुक्यात अतिवृष्टीची नोंद झाली होती.