'खून करून चेहरा जाळला, टॅटूने झाला उलगडा'; नांदेडच्या तरुणाची परळीत नेऊन हत्या

By शिवराज बिचेवार | Published: June 7, 2023 06:11 PM2023-06-07T18:11:34+5:302023-06-07T18:12:53+5:30

हातावरील टॅटूने फुटली खुनाला वाचा; जुन्या वादातून तरुणाला संपवले

'Face burned after murder, revealed by tattoo'; A youth of Nanded was taken to Parali and killed | 'खून करून चेहरा जाळला, टॅटूने झाला उलगडा'; नांदेडच्या तरुणाची परळीत नेऊन हत्या

'खून करून चेहरा जाळला, टॅटूने झाला उलगडा'; नांदेडच्या तरुणाची परळीत नेऊन हत्या

googlenewsNext

नांदेड : मित्रासाेबत झालेल्या भांडणाचा राग मनात धरून त्याला चारचाकीने परळीला नेण्यात आले. त्या ठिकाणी दारू पाजवून त्याचा खून केला. नंतर डिझेल टाकून प्रेत जाळून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. परंतु मयताच्या हातावर असलेल्या टॅटूने मयताची ओळख पटली अन् खुनाला वाचा फुटली. या प्रकरणात विमानतळ पोलिसांनी दोघांच्या मुसक्या आवळल्या आहेत. 

विमानतळ पोलिस ठाण्याच्या हद्दीतील बेबीताई परमेश्वर शिंदे रा. विस्तारीत नाथनगर यांचा मुलगा सचिन शिंदे २९ मे रोजी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास परभणी येथे वसुलीसाठी जात असल्याचे सांगून घराबाहेर पडला होता. परंतु त्यानंतर तो परतलाच नाही. त्यामुळे बेबीताई यांनी ४ जून रोजी विमानतळ पोलिस ठाण्यात तो बेपत्ता झाल्याची तक्रार दिली. विमानतळ पोलिसांकडून सचिन शिंदेचा शोध सुरू होता. त्यातच ३१ मे रोजी परळी ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका अनोळखी तरुणाचे प्रेत आढळल्याची नोंद होती. 

या मयताची शोधपत्रिका विमानतळ पोलिसांना व्हॉट्सॲप मिळाली होती. त्यामध्ये परळी येथील मयताच्या हातावर इंग्रजीत स्नेहा नावाचा टॅटू असल्याचे नमूद होते. तर दुसरीकडे सचिन शिंदे यांच्या आईच्या तक्रारीतही या टॅटूचा उल्लेख होता. त्यामुळे विमानतळ पाेलिसांना परळी येथील तरुणाचे प्रेत हे सचिन शिंदेचे असल्याची खात्री पटली. त्यानंतर पोलिसांनी सचिन शिंदे याच्या मोबाइल क्रमांकाचे सर्व रेकॉर्ड तपासले. त्यात रेकॉर्डवरील आरोपी दिलीप हरसिंग पवार रा. विस्तारीत नाथनगर याच्याशी सचिनचे शेवटचे संभाषण झाल्याचे आढळून आले. पोलिसांनी लगेच दिलीप पवार याच्या मुसक्या आवळून पोलिसी खाक्या दाखविला. त्यानंतर त्याने सचिनच्या खुनाची कबुली दिली. 

या प्रकरणात पोलिसांनी दिलीप पवार याला खुनात सहकार्य करणाऱ्या सचिन जाधव याच्यावरही गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पोलिस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अप्पर पोलिस अधीक्षक अबिनाश कुमार, उपाधीक्षक सूरज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि.साहेबराव नरवाडे, सपोनि विजय जाधव, सपोउपनि बाबा गजभारे, दारासिंग राठोड, बंडू कलंदर, दत्तात्रय गंगावरे, दिगांबर डोईफोडे, अंकुश लांडगे यांनी ही कारवाई केली.

एकाने रुमालाने गळा आवळला तर दुसऱ्याने खंजर मारला
सायंकाळी सात वाजता घरातून पडलेल्या सचिन शिंदे याला एम.एच.२०, बीटी.९९२६ या क्रमांकाच्या वाहनाने घेऊन दिलीप पवार हा परभणी मार्गे सोनपेठला गेला होता. सोनपेठ येथून त्याने नातेवाईक सचिन जाधव याला सोबत घेतले. त्यानंतर तिघे परळी मार्गे गेले. तत्पूर्वी सचिन शिंदे याला दारू पाजण्यात आली. मौजे रामनगर तांडा येथे गायरान जमिनीवर आरोपी दिलीप पवार हा गाडी चालवत होता. सचिन शिंदे हा पुढच्या सीटवर तर सचिन जाधव हा पाठीमागे बसलेला होता. त्याचवेळी सचिन जाधव याने रुमालाने पाठीमागून सचिन शिंदे याचा गळा आवळला. तर दिलीप पवार याने खंजरने सचिन शिंदेच्या पोटावर वार केले. त्यात शिंदे याचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर प्रेतावर डिझेल टाकून ते पेटविण्यात आले. त्यात चेहरा संपूर्ण जळाला होता. परंतु हातावरील टॅटूने खुनाला वाचा फुटली.

मारहाणीचा बदला घेण्यासाठी खून
आरोपी दिलीप पवार आणि मयत सचिन शिंदे यांच्यात मे महिन्यात भांडण झाले होते. त्यावेळी शिंदे याने पवारला मारहाण केली होती. या भांडणाचा राग मनात ठेवून पवार याने शिंदे याचा काटा काढण्याचा कट रचला. त्यासाठीच चारचाकी वाहनाने त्याने सचिनला परळीला नेले. तर सचिनने मात्र घरातून निघताना वसुलीसाठी परभणीला जात असल्याचे खोटे सांगितले होते.

Web Title: 'Face burned after murder, revealed by tattoo'; A youth of Nanded was taken to Parali and killed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.