संशयाच्या वादळाने होतो कुटुंबाचा विनाश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2018 12:05 AM2018-02-16T00:05:43+5:302018-02-16T00:06:55+5:30
महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीत एका पेक्षा एक सरस नाट्य कलाकृतींचा आस्वाद नांदेडकर रसिक प्रेक्षकाना मिळतो आहे. मानवी स्वभावात दडून बसलेले संशय नावाचे वादळ कधी उफाळेल आणि सुखी चाललेल्या कुटुंबाचा विनाश करेल हे सांगता येत नाही. हेच ‘द. गिफ्ट’ या नाट्यकृतीने अत्यंत प्रभावीपणे दाखवून दिले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड : महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीत एका पेक्षा एक सरस नाट्य कलाकृतींचा आस्वाद नांदेडकर रसिक प्रेक्षकाना मिळतो आहे. मानवी स्वभावात दडून बसलेले संशय नावाचे वादळ कधी उफाळेल आणि सुखी चाललेल्या कुटुंबाचा विनाश करेल हे सांगता येत नाही. हेच ‘द. गिफ्ट’ या नाट्यकृतीने अत्यंत प्रभावीपणे दाखवून दिले.
हेमंत एदलाबादकर लिखित, शुभंकर एकबोटे दिग्दर्शित हे दोन पात्री नाटक रसिक प्रेक्षकाना शेवटपर्यंत खिळवून ठेवण्यास यशस्वी ठरले. कुसुम सभागृह येथे हनुमान नगर सांस्कृतिक सेवा मंडळ, पुण्याच्या वतीने सादर झालेले हे नाटक आजच्या काळातील स्त्री पुरुषांचे ताणलेले नातेसंबंध, त्यात आलेला अधिक मोकळेपणा, जागतिक स्वैेराचारांचे उमटलेलं प्रतिबिंब या आणि आशा अनेक गोष्टींचा परिणाम या नाटकातून दिसत होता.
या नाटकातील मिताली (अधिश्री वाडोदकर) आणि यश (राजेश काटकर) यांच्या लग्नाला एक वर्ष होण्यास काही तास बाकी असतात आणि ते एक दुसºयांना काय गिफ्ट देणार या उत्सुकतेत असतात. बारा वाजण्यास काही तास शिल्लक असल्या कारणाने त्यांच्यात गप्पा रंगतात आणि अश्यातच अनपेक्षित येणारा मितालीच्या आॅफिसमधील तिच्या मित्राचा फोन जे सोबत स्त्री मुक्ती विषयी काम करीत असतात. आणि सुरु होतो संशयाचा खेळ. लग्नाला एक वर्ष पूर्ण होत असताना दोघेही वर्षभरातील संशयाच्या जागा भरून काढतात आणि नाटकाच्या शेवटी हे सर्व मिथ्य आहे. फक्त संशय आहे हे उघड होतं. वास्तववादी स्वरुपातील नेपथ्य चिन्मय पटवर्धन यांनी उभे केले, अनिल टाकळकर यांनी प्रकाशयोजना सांभाळली, तर वेशभूषा रचना पटवर्धन आणि संगीत वृषाली काटकर यांनी आशयानुरूप साकारली.
स्वर्गातील तीन जोडप्यांची कथा
शंकरराव चव्हाण सभागृहात विद्यासागर अध्यापक लिखित, दिग्दर्शीत ‘दर्द ए डिस्को’ हे नाटक सादर झाले. स्वर्गात आलेल्या तीन जोडपे व एक मॅनेजरवर यांच्यावर आधारित नाटक आहे. या नाटकात नाटककाराने फँटसीचा आधार घेत विविध पात्रांच्या संवादातून मानवी मनातील सेक्सविषयीचे विचार, भावना व त्यांकडे बघण्याची त्यांचा दृष्टीकोन अभिव्यक्त केला आहे. कशासाठी हे वासनांचे डोह? कधी सुटका होणार ह्यातून? कधी या जन्म मृत्युच्या अग्निपरीक्षेतून बाहेर पडणार? असे प्रत्येकालाच सामान्यपणे पडणारे पण मानवी जगण्याचं नेमकं प्रयोजन तरी काय हे शोधणारे, तसेच प्रश्नही निर्माण करणारे हे नाटक आहे. ज्यातून नेणिवेचा एक नवीनच पटल उलगडत जातो. यात प्रभाकर वर्तक, उमा नामजोशी, धनश्री गाडगीळ, अनुप बेलवलकर, अनिरुद्ध दांडेकर, आफरीन शेख, यशवंत कुलकर्णी यांनी भूमिका साकारल्या.