मालमत्तेच्या वादातून कुटूंबाने संपवली जीवनयात्रा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 1, 2020 06:45 PM2020-10-01T18:45:42+5:302020-10-01T18:48:57+5:30
दोन भावातील मालमत्तेचा वाद विकोपाला गेल्याने मोठ्या भावाने पत्नी, दोन मुली व एका मुलासह सहस्त्रकुंड धबधब्यात उडी मारून आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी घडली. यातील जणांचे शव मिळाले असून दोघांचा अजूनही शोध लागला नसल्याचे पोलिसांनी सांगितले.
हदगाव : दोन भावातील मालमत्तेचा वाद विकोपाला गेल्याने मोठ्या भावाने पत्नी, दोन मुली व एका मुलासह सहस्त्रकुंड धबधब्यात उडी मारून आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी घडली. यातील ३ जणांचे शव मिळाले असून दोघांचा अजूनही शोध लागला नसल्याचे पोलिसांनी सांगितले.
प्रवीण भगवानराव कवानकर (वय ४२), त्यांच्या पत्नी अश्विनी प्रवीण कवानकर (वय ३८), मोठी मुलगी सेजल कवानकर (वय २०), दुसरी मुलगी समीक्षा (वय १४) व लहान मुलगा सिद्धेश (वय १३) अशी मयतांची नावे आहेत. यवतमाळ जिल्ह्यातील मुरली गावाजवळील सहस्त्रकुंड धबधब्यात या सर्वांनी उड्या मारून आपली जीवनयात्रा संपविली.
भगवानराव कवानकर हे कवाना ता. हदगाव येथील प्रतिष्ष्ठित व्यापारी आहेत. हदगाव येथे त्यांचे मोठे किराणा दुकान आहे. त्यांच्या दोन मुलांमध्ये मालमत्तेचा वाद सुरू होता. हा वाद टोकाला पोहोचला. या वादाला कंटाळून मोठा मुलगा प्रविण यांनी आपल्या कुटुंबासह सहस्त्रकुंड धबधब्यात उडी मारली. यातील प्रवीण, अश्विनी, मुलगा सिद्धेश यांची प्रेते मिळाली आहेत तर समीक्षा आणि सेजल या दोन मुली अजूनही बेपत्ता आहेत. दोन दिवसांपूर्वी हदगाव येथून चारचाकी वाहन भाड्याने घेवून कवानकर कुटुंब सहस्त्रकुंड येथे पोहचले होते. आमचा मेहुणा येत आहे, असे सांगून त्यांनी वाहन परत पाठविले.