अतिवृष्टी अन् मुलीच्या उपचाराच्या चिंतेत शेतकऱ्याची आत्महत्या
By शिवराज बिचेवार | Published: September 13, 2022 05:12 PM2022-09-13T17:12:33+5:302022-09-13T17:12:37+5:30
अतिवृष्टीमुळे शेतात प्रचंड नुकसान झाले. त्यामुळे ते निराश झाले होते.
नांदेड- अतिवृष्टीमुळे शेतीत अगोदरच झालेले नुकसान. त्यात बँकेचेही डोक्यावर कर्ज. अशा परिस्थितीत अपंग मुलीचे उपचार कसे करायचे या चिंतेने ग्रासलेल्या शेतकर्याने विषारी गोळ्या खाऊन आत्महत्या केली. ही घटना लोहा तालुक्यातील गोळेगाव येथे घडली.
शंकर जयराम कपाळे (४२) असे मयत शेतकऱ्याचे नाव आहे. त्यांच्यावर महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे ८३ हजार ३६ रुपयांचे कर्ज आहे. यंदा पीक चांगले आल्यानंतर कर्ज फेडण्याच्या विचारात ते होते. परंतु अतिवृष्टीमुळे शेतात प्रचंड नुकसान झाले. त्यामुळे ते निराश झाले होते. त्यात घरात अपंग मुलीच्या उपचारासाठीही पैसे नाहीत. मुलांचे शिक्षण कसे करावे या नैराश्यात त्यांनी विषारी गोळ्या खाल्ल्या. उपचारासाठी त्यांना नांदेडच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु या ठिकाणी त्यांची प्राणज्योत मालविली.या प्रकरणात शिवाजी कपाळे यांच्या माहितीवरुन उस्माननगर पोलिसांनी नोंद केली.