मंजूर कर्ज देण्यास टाळाटाळ, हतबल शेतकऱ्याची बँकेबाहेरील खिडकीस गळफास लावून आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 8, 2021 05:49 PM2021-11-08T17:49:55+5:302021-11-08T17:52:06+5:30
Farmer suicide: २०१८ मध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळाकडून ५ लाख रुपयांचे कर्ज किराणा दुकानासाठी मंजूर झाले होते.
नायगाव ( नांदेड ) : लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळाकडून मंजूर झालेले कर्ज वाटप करण्यास स्टेट बँक ऑफ इंडियाच्या नायगाव येथील शाखेकडून टाळाटाळ होत असल्याने देगाव ( ता.नायगाव ) येथील लाभार्थी आनंदा महाजन रोडे यांनी बँकेच्या समोर खिडकीला गळफास घेवून आत्महत्या (Farmer suicide) केली. या घटनेमुळे खळबळ उडाली असून बँक प्रशासन खडबडून जागे झाले आहे.
मयत आनंदा रोडे मूळ देगाव येथील असून नायगाव नगर पंचायतमध्ये कंत्राटी रोजगार म्हणून काम करीत होते. त्यांच्या पत्नी सुशीलाबाई यांच्या नावे २०१८ मध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळाकडून ५ लाख रुपयांचे कर्ज किराणा दुकानासाठी मंजूर झाले होते. तसे पत्र बँकेच्या तत्कालीन व्यवस्थापकांना देण्यात येवून १५ दिवसात कारवाई करण्याचे आदेशित करण्यात आले होते. यानुसार आनंदा रोडे यांनी बँकेचे शाखाधिकारी यांच्याशी संपर्क केला. सुरुवातीला आज नाही, नंतर या असे त्यांना सांगण्यात आले. या दरम्यान, त्यांना कुटुंबातील व्यक्तींच्या नावे असलेली इतर कर्जापोटी ३० हजार रुपये भरणा करण्यास सांगण्यात आले. मात्र रोडे यांची आर्थिक परिस्थिती नव्हती. तरीही त्यांनी खाजगी कर्ज काढून पैसे भरले. याउपर बँक अधिकाऱ्यांनी आम्ही गावात येवून स्थळ पाहणी करतो, असे सांगितले. त्यालाही बरेच दिवस लोटले. या दरम्यान रोडे यांनी दलालामार्फतही मंजूर कर्ज पदरी पाडून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यात त्यांना यश आले नाही.
यादरम्यान बँक व्यवस्थापक मीना यांची बदली झाली. त्यांच्या जागेवर आलेले शाखाधिकारी पवार यांनी या प्रकरणाचा श्रीगणेशा पुन्हा नव्याने सुरू केला. त्यांनीही रोडे यांना टाळाटाळ करीत तब्बल दोन वर्षे हे प्रकरण प्रलंबित ठेवले. कर्ज मिळेल या आशेपोटी रोडे यांनी खाजगी सावकाराचे कर्ज काढून ते बँकेत भरले. तरीही यश न आल्याने अस्वस्थ झालेल्या आनंदा रोडे यांनी ६ नोव्हेंबर शनिवारी रात्री १० ते ११ च्या दरम्यान स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा नायगाव येथील डॉ.हेडगेवार चौकात असलेल्या शाखेच्या बाहेर खिडकीच्या गजाला दोरी बांधून गळफास लावून आत्महत्या केली.
सदरील घटना एका पादचारी व्यक्तीने पाहिल्यानंतर त्याने लगेच रात्रीच्या गस्तीवरील नायगाव पोलिसांना सांगितले. पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. मयताच्या गळ्यातील नगर पंचायत नायगावच्या ओळखपत्रावरून देगाव येथील नातेवाईक यांना संपर्क साधून मृतदेह ग्रामीण रुग्णालय नायगाव येथे उत्तरीय तपासणीसाठी नेले. मयताचा मुलगा सतीश रोडे (वय २८) यांनी नायगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार आकस्मिक मृत्यू म्हणून या घटनेची नोंद घेण्यात आली. पोलीस निरीक्षक अभिषेक शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार मुस्तापुरे तपास करीत आहेत.
चौकशी करून कारवाई होईल
ही घटना दुर्देवी आहे. २०१८ पासून प्रकरण प्रलंबित ठेवण्याचे कारण काय, याची चौकशी करण्यासाठी मला वरिष्ठांनी सांगितले आहे. घटनास्थळ पाहणी व चौकशीसाठी नायगावला जाणार आहोत. यात दोषींवर कारवाई करण्याचा प्रस्ताव वरिष्ठांना देवू.
- शंकर येरावार, मुख्य व्यवस्थापक, क्षेत्रीय कार्यालय, नांदेड.