वीज जोडणीसाठी शेतकऱ्यांचे कुटुंब, बैलगाडीसह महावितरण कार्यालयात बस्तान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2021 06:37 PM2021-12-30T18:37:51+5:302021-12-30T18:38:58+5:30
गेल्या आठ दिवसांपासून महावितरण प्रशासनाने विज पुरवठा बंद केला आहे.
अर्धापूर ( नांदेड ) : महावितरणने वीज पुरवठा तोडल्याने शेतकरी मेटाकुटीस आला आहे. खंडित केलेला वीजपुरवठा सुरळीत करावा या मागणीसाठी अर्धापूर येथील महावितरण कार्यालयात गांधीगिरीच्या मार्गाने शेतकऱ्यांनी सहपरिवार ठिय्या आंदोलन करून महावितरण प्रशासनाला धारेवर धरले आहे.
रब्बी हंगामाची पेरण्या झाल्या हवामानातील बदल, विविध अडचणींचा सामना करत कशीबशी पिके डोलत होती. गेल्या आठ दिवसांपासून महावितरण प्रशासनाने विज पुरवठा बंद केला आहे. शेतातील पिके कोमेजुन जात असल्याने व पिण्यासही पाणी नसल्याने अर्धापूर तालुक्यातील कोंढा येथील शेतकरी चिंतातुर अवस्थेत व्याकुळ झाला आहे. हाताला आलेली पिके जाऊ नये यासाठी बोअरवेल, विहीरीतील पाणी पिकांना देऊन जिवनदान देण्याचा प्रयत्न करत आहेत. शेतकऱ्यांसमोर समस्यांचा डोंगर उभा राहिल्याने अखेर कोंढा येथील शेतकऱ्यांनी आज गांधीगिरी मार्गाने आंदोलन केले.
शेतकऱ्यांनी सहपरिवार बैलगाडी, जनावरे घेऊन अर्धापूर येथील महावितरणच्या कार्यालयात ठाण मांडले. आमच्यासह जनावरांची व्यवस्था करा म्हणत जनावरे कार्यालयातच बांधली. शेती नाही तर खाल माती अशा घोषणा ऊर्जा मंत्र्यांच्या विरोधात करण्यात आल्या. वीजपुरवठा बंद करून आघाडी शासन शेतकऱ्यांना निजामाप्रमाणे वागणूक देत आहे, अशा भावना यावेळी शेतकऱ्यांनी व्यक्त केल्या. दरम्यान, शेतकऱ्यांच्या ६ तासांच्या आंदोलनाला यश आले असून महावितरणने माघार घेत विद्युत पुरवठा पूर्ववत सुरू करण्यात आला आहे.
आंदोलनात गुणवंत हंगरगेकर, अँड किशोर देशमुख, अँड.बि.टी.पवार, धर्मराज देशमुख, शिवाजी पवार, बालाजीराव गव्हाणे, पप्पू पाटील, प्रल्हाद इंगोले, मुन्ना कदम, राम कदम, गणेश कदम, अँड.बालाजी कदम, रामराव कदम, अशोक कदम, माधवराव कदम, पप्पू कदम यांच्यासह हजारो शेतकरी व महिलांचा सहभाग होता.