दोनदा अहवाल देवूनही शेतकरी अनुदानापासून वंचित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2019 12:25 AM2019-03-16T00:25:43+5:302019-03-16T00:28:10+5:30
बारुळ व उस्माननगर मंडळात गत नऊ महिन्यांपूर्वी ढगफुटी होऊन प्रचंड प्रमाणात नुकसान झाले. यातील नुकसानग्रस्तांना मात्र अद्यापपर्यंत शासकीय आर्थिक मदत मिळाली नाही.
बारुळ : बारुळ व उस्माननगर मंडळात गत नऊ महिन्यांपूर्वी ढगफुटी होऊन प्रचंड प्रमाणात नुकसान झाले. यातील नुकसानग्रस्तांना मात्र अद्यापपर्यंत शासकीय आर्थिक मदत मिळाली नाही. सुरुवातीला तर प्रशासनाने नुकसान झालेच नसल्याचा 'निरंक' अहवाल तयार केला होता. 'लोकमत' ने तालुका प्रशासनाच्या या अक्षम्य कारभाराबाबत वृत्त प्रकाशित केल्यानतर पुन्हा दुसरा अहवाल तयार केला मात्र अद्यापपर्यंत नुकसानग्रस्त मदतीपासून वंचित आहेत.
कंधार तालुक्यातील बारुळ व उस्माननगर महसूल मंडळात जून २०१८ मध्ये मुसळधार पाऊस झाला होता. तीन दिवस झालेल्या पावसानंतर २३ जून रोजी मध्यरात्री सर्वजण झोपेत असताना अक्षरश: ढगफुटी झाली. अचानक झालेल्या प्रचंड पावसामुळे या दोन्ही महसूल मंडळातील जवळपास सर्वच गावांतील शेती खरडून गेली. उभी पिके आडवी पडली. घरांमध्ये पाणी शिरल्याने घरातील संसारोपयोगी साहित्याची नासधूस झाली. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला. त्यावेळी प्रशासकीयस्तरावर बारुळ मंडळात १४० व उस्माननगर मंडळात ११० मी.मी.पावसाची नोंदही झाली होती.
या घटनेनंतर तालुक्यातील आजी-माजी सर्वच पुढाऱ्यांनी नुकसानग्रस्त गावांना भेटी देवून पाहणी केली. अतिवृष्टीमुळे प्रचंड नुकसान झाल्याचे सांगत तात्काळ पंचनामे करण्यास सांगून नुकसान भरपाई तात्काळ मिळून देण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन पुढाऱ्यांनी त्यावेळी दिले होते.
तहसीलदारांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही पाहणी करून पंचनामा करण्याचे आदेश दिल्यानंतर प्रशासनाकडून पंचनामे करण्यात आले. प्रचंड प्रमाणात नुकसान झाल्यानंतरही पंचनामा करणाºया संबंधित कर्मचाºयांनी मात्र नुकसान झाले नसल्याचे सांगत सुरुवातीला निरंक अहवाल सादर केला होता.
तालुका प्रशासनाच्या या चुकीच्या अहवालामुळे नुकसानग्रस्तांच्या हाती 'भोपळा' मिळण्याची भीती 'लोकमत' ने व्यक्त केल्यानंतर वरिष्ठ अधिका-यांनी याची दखल घेतली. यानंतर जागे झालेल्या तालुका प्रशासनाने नुकसान झाल्याचा दुसरा अचूक अहवाल तयार करून जिल्हाधिका-यांकडे पाठविला. त्यासही तीन ते चार महिन्यांचा कालावधी उलटला आहे.
ढगफुटीची घटना होऊन नऊ महिन्यांचा कालावधी उलटला असूनही अतिवृष्टीग्रस्त अजूनही शासकीय मदतीच्या प्रतीक्षेत आहेत. मात्र, अद्यापपर्यंत त्यांना आर्थिक मदत मिळालेली नाही. त्यामुळे या कारभाराबद्दल नुकसानग्रस्तांमधून रोष व्यक्त केला जात आहे.
‘त्या’ कर्मचा-यांवर कारवाई कधी होणार?
ढगफुटीच्या घटनेत प्रचंड प्रमाणात नुकसान झाले. वरिष्ठ अधिका-यांनीही आपल्या डोळ्यांनी हे दृश्य पाहिले होते. तहसीलदारांच्या आदेशानंतर पंचनामा करण्यासाठी त्या- त्या भागाचे तलाठी, ग्रामसेवक व कृषी सहायक यांची नेमणूक करण्यात आली होती.
सर्व काही वाहून गेले असताना त्या संबंधित कर्मचा-यांनी पंचनामा करून नुकसान झाले नसल्याचा निरंक अहवाल तहसील कार्यालयात सादर केला होता. चुकीचा अहवाल सादर करणा-या त्या कर्मचा-यांवर मात्र कसलीच कार्यवाही प्रशासना- कडून करण्यात आलेली नाही.
बारुळ येथे झालेल्या ढगफुटीचा प्रशासनाने खेळ केला. आधी ढगफुटी नाही म्हणून नुकसान निरंक दाखविले होते.‘लोकमत’ने आवाज उठविला की लगेच नुकसान झालेले दाखविले .या ढगफुटीला आज आठ ते नऊ महिन्यांचा काळ झाला.शेतक-यांचे शेतीचे,नागरिकांचे घरांचे नुकसान होऊनही नुकसान भपाईसाठी रस्त्यावर उतरण्याची वाट शासन बघत आहे का? - मारोती पा.मजरे, शेतकरी बारुळ.
बारुळ येथील ढगफुटीचा नुकसान भरपाईचा अहवाल जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर केला. येत्या एका महिन्यात नुकसान भरपाई मिळण्याची शक्यता आहे -उत्तम जोशी (वरिष्ठ लिपिक), नैसर्गिक अपत्ती व्यवस्थापन तहसील कार्यालय कंधार.