शेतकऱ्यांना रोपे मिळण्यास पुन्हा अडकाठी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 3, 2018 12:43 AM2018-11-03T00:43:20+5:302018-11-03T00:43:35+5:30
नर्सरीला रोपाचे परमिटपत्रक जूनमध्ये तर हिमायतनगर कृषी कार्यालयात आवंटनचे पत्र आॅक्टोबरमध्ये दिले आहे़ त्यामुळे रोपे मिळण्यास अडचणी निर्माण झाल्याने शेतक-यांत संताप व्यक्त केला जात आहे़
लोकमत न्यूज नेटवर्क
हिमायतनगर : तालुक्यातील शेतक-यांना रोजगार हमी योजनेअंतर्गत फळबाग लागवड मंजूर झाली होती़ मात्र दोन वर्षांपासून लाभार्थी शेतक-यांना रोपे मिळाले नाहीत़ दरम्यान, नर्सरीला रोपाचे परमिटपत्रक जूनमध्ये तर हिमायतनगर कृषी कार्यालयात आवंटनचे पत्र आॅक्टोबरमध्ये दिले आहे़ त्यामुळे रोपे मिळण्यास अडचणी निर्माण झाल्याने शेतक-यांत संताप व्यक्त केला जात आहे़
२०१६-१७ मध्ये हिमायतनगर तालुक्यातील शेतक-यांनी रोजगार हमी योजनेअंतर्गत फळबाग लागवड मंजूर झाली होती़ कृषी कार्यालयाकडून मंजुरी मिळवून शेतात खड्डे करुन शेणखताने भरले होते़ त्याचे मस्टर काढले, मात्र कृषी विभागाकडून दोन वर्षांपासून रोपे मिळाले नाहीत़ ही शेतक-यांची व्यथा ‘लोकमत’ने प्रकाशित केली होती़ त्यामुळे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाकडून दखल घेऊन १० सप्टेंबर रोजी रोपाचे आवंटन पत्र पाठवले़ त्यानंतर हिमायतनगर कृषी कार्यालयाकडून विजय नर्सरी लिंबगाव ता. नांदेड या नर्सरीचे फळबागेचे परमिट वाटप केले होते़ परमिट मिळाल्यानंतर शेतक-यांनी चारचाकी वाहन भाड्याने करुन रोपे आणण्यासाठी लिंबगाव गाठले़ नर्सरीतील मालकास परमिट देऊन रोपाची मागणी केली़
मात्र नर्सरी धारकाने रोपे आमच्याकडे उपलब्ध नाहीत़ नांदेड कृषी कार्यालयाकडून जूनमध्ये पत्राद्वारे रोपाची मागणी केली होती़ त्या प्रक्रियेला तब्बल चार महिने उलटून गेले असल्याने आम्ही आपली वाट पाहून रोपे दुसरीकडे विकून टाकली, असे सांगितले़
अन शेतक-यांना रोपे मिळालेच नाहीत
हिमायतनगर तालुक्यातील शेतक-यांना रोजगार हमी योजनेअंतर्गत फळबाग लागवड मंजूर झाली होती़ कृषी कार्यालयाकडून मंजुरी मिळवून शेतात खड्डे करुन शेणखताने भरले होते़ त्याचे मस्टर काढले़ मात्र कृषी विभागाकडून दोन वर्षांपासून रोपे मिळाले नाही़
शेतकºयांचा हा प्रश्न ‘लोकमत’ने समोर आणला होता़ त्यामुळे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाकडून दखल घेऊन १० सप्टेंबर रोजी रोपाचे आवंटनपत्र पाठवले आणि लगेच हिमायतनगर कृषी कार्यालयाकडून विजय नर्सरी लिंबगाव ता.नांदेड या नर्सरीचे फळबागेचे परमिट वाटप केले होते़
लिंबगाव येथील नर्सरीतून रोपे आणण्यासाठी शेतकरी गेले असता सदरील नर्सरी धारकाने आमच्याकडे रोपे उपलब्ध नसल्याचे सांगितले़ त्यामुळे शेतक-यांना रोपे न घेताच परत फिरावे लागले़
हे सर्व वरिष्ठ कार्यालयाकडून घडले
शेतक-यांनी येथील कृषी अधिकारी गडंबे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, दोन दिवसांपूर्वी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाकडून आमच्या कृषी कार्यालयात आवंटन पाठवल्याने आम्ही ताबडतोब परमिट लाभार्थ्याना दिले़ यात माझा व हिमायतनगर कृषी कार्यालयाचा काय दोष ? हे सर्व वरिष्ठ कार्यालयाकडून घडले़
नर्सरीला रोपाचे परमिटपत्रक जूनमध्ये आणि हिमायतनगर कृषी कार्यालयात आवंटनचे पत्र आक्टोबरमध्ये दिले़ या गोंधळामुळे शेतक-यांना वाहन भाड्यासाठी प्रत्येकी ४ हजार रुपये विनाकारण खर्च करावे लागले़ अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाच्या ढिसाळ कारभारामुळे शेतक-यांकडून संतापजनक प्रतिक्रिया येत आहेत़
२६८३० रोपांचे परमिट
नरेगाअंतर्गत समृद्ध महाराष्ट्र जनकल्याण योजनेमधून कलमे-रोपे लावण्यासाठी एकूण ८२ शेतकरी फळबागेचे लाभार्थी आहेत़ त्यात ६३़५५ हेक्टर जमीन आरक्षित झाली होती़ त्यामध्ये आंबा, सीताफळ, मोसंबी, आवळा, लिंबू आदींचा सहभाग होता़
मोसंबीचे रोपे सोडली तर इतर रोपांची पूर्तता झाली नल्याचे सांगितले जाते़ आजस्थितीला ५८़४० हेक्टर जमिनीसाठी २६८३० रोपाचे परमिट दिले असल्याचे कृषी कार्यालयाकडून सांगण्यात आले़