दुष्काळी अनुदानातून हजार रुपयांची कपात झाल्याने शेतकरी संतप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2019 04:51 PM2019-11-28T16:51:39+5:302019-11-28T16:55:30+5:30
उमरीत बँक व्यवस्थापकाला शेतकऱ्यांचा घेराव
उमरी (जि. नांदेड) : दुष्काळ व अतिवृष्टीने ग्रासलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झालेल्या दुष्काळी अनुदानातून एक हजार रुपये कपात करण्यात येत आहेत़ त्यामुळे संतप्त झालेल्या उमरी येथील शेतकऱ्यांनी बुधवारी बँक व्यवस्थापक डी़ आऱ देशमुख यांना घेराव घातला.
सध्या जिल्हा बँकांच्या शाखांमधून गतवर्षीच्या दुष्काळी अनुदानाचे वाटप होत आहे. हे वाटप होत असताना कमीत कमी एक हजार रुपयांची रक्कम खात्यावर जमा असणे आवश्यक आहे. त्याशिवाय अनुदान मिळणार नाही असा नियम बँकेने सुरू केला. संगणकीय पद्धतीवरुन तशी फीडींग झालेली आहे. असे कारण सांगून एक हजार रुपये कपात करण्याचा प्रकार सुरू झाला. याबाबत शेतकऱ्यांनी व्यवस्थापक देशमुख यांना जाब विचारला़ परंतु या नियमात कुठलाही बदल होणार नाही, असे उत्तर व्यवस्थापकांनी दिले़ त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी तहसील कार्यालय गाठून तहसीलदारांकडे जाऊन कैफियत मांडली.
तहसीलदार माधव बोथीकर यांनी लगेच व्यवस्थापक देशमुख यांना पाचारण केले. अनुदानाची रक्कम संबंधित खातेदारांच्या खात्यात थेट जमा करावी, ज्या शेतकऱ्याचे बँकेत बचत खाते नसतील त्यांचे जनधन योजनेखाली झिरो बॅलन्स खाते उघडून त्या खात्यात मदत रक्कम जमा करण्यात यावी, या रकमेतून कोणतीही थकबाकी वसूल करू नये, आदी सूचना दिल्या. या सूचनेला व्यवस्थापकांनी दाद दिली नाही़ जोपर्यंत वरिष्ठ कार्यालयाकडून काही आदेश मिळत नाहीत, तोपर्यंत मला काही करता येणार नाही़ अशी कबुली देशमुख यांनी दिली़
शेतकऱ्यांनी दिला आंदोलनाचा इशारा
शेतकऱ्यांनी याप्रकरणी तहसीलदारांना निवेदन दिले. त्यावरून तहसीलदारांनी बँकेला लेखी पत्र दिले. मात्र, त्यावर कसलीच कारवाई झालेली नाही. एक दिवसाच्या अवधीनंतर या समस्येवर तोडगा निघाला नाही तर आंदोलनाचा इशारा शेतकऱ्यांनी दिला. यावेळी शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष माधवराव पुयड सिंधीकर, संजय राठोड, बाबूराव शिंदे, मारुती पोलादे, शेषराव निकलपुरे, संजयकुमार अमृतवाड, रामराव राठोड, पांडुरंग हामंद, बालाजी राठोड, किशन शिंदे, बाबूराव मुंडकर, नामदेव राठोड, दिगंबर चिंताके, अनिल राठोड, दत्तात्रेय कारेगावे, दिलीप राठोड, वामन राठोड, गणपत कारेगावे आदींची उपस्थिती होती.