बळीराजा समाधानी; नांदेड जिल्ह्यात झाली रबीची १५६ टक्के पेरणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2020 08:18 PM2020-01-01T20:18:23+5:302020-01-01T20:20:14+5:30
मुबलक प्रमाणात पाणीसाठा उपलब्ध झाल्याने यंदा रबीच्या पेरणीक्षेत्रात वाढ
नांदेड : यंदा झालेल्या पावसामुळे आणि सिंचन क्षेत्र अवलंबून असलेलय येलदरी, इसापूर धरणात मुबलक प्रमाणात पाणीसाठा उपलब्ध झाल्याने यंदा रबीच्या पेरणीक्षेत्रात वाढ झाली आहे़ आजपर्यंत जवळपास १५६ हेक्टरवर रबीची पेरणी झाली आहे़
मृग नक्षत्रानंतर अपेक्षेप्रमाणे पाऊस झाला़ त्यामुळे खरीपातील पेरण्या वेळेवर होण्यास मदत झाली़ परंतु, नंतर पावसाने उघडीप दिल्याने पिकांची वाढ खुंटली़ त्यातून उत्पन्न घटनार अशी स्थिती असताना आॅक्टोबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीने हाती आलेले जवळपास सर्व पीक गेली़ त्यामुळे मेटाकुटीस आलेल्या शेतकऱ्यांना यंदाचा रबी हंगाम समाधानकारक असल्याचे दिसत आहे़ नांदेड जिल्ह्यात रबी पेरणी क्षेत्रात यंदा दीडपट वाढ झाली आहे.
आजघडीला नांदेड जिल्ह्यात रबी ज्वारी २८० हेक्टर वर पेरली असून त्याची टक्केवारी १०४ एवढी आहे. त्याच बरोबर ५७ टक्के गव्हाची पेरणी पुर्ण झाली आहे. रबी मक्का ८३.३६ टक्के, इतर तृण धान्य ३७९.५५ टक्के, हरभरा २५२.०९ टक्के इतर कड धान्य १५३०९ टक्के यासह तीळ, मोहरी, सुर्यफुल, जवस आदी पिकांची पेरणी झाली आहे. नांदेड जिल्ह्यातील रबीचे सर्वसाधारण क्षेत्र १३६७.१२ हेक्टर एवढे आहे. परंतु मुबलक प्रमाणात यंदा पाणी उपलब्ध होत असल्याची बाब लक्षात घेऊन शेतकरऱ्यांनी खरीपाची पेरणी केली आहे. जवळपास २ हजार ९४६ हेक्टरवर खरीपाची पेरणी झाली आहे. यापुढेही ५० हजार हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर खरिपाची पेरणी होईल असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
जिल्हाधिकारी अरुण डोंगरे व मुख्यकार्यकारी अधिकारी अशोक काकडे यांनी रबी नियोजनासाठी तीन बैठका घेतल्याहोत्या. या बैठकांमध्ये सिंचन, विद्युत पुरवठा तसेच खते व बियाणे याचे नियोजन करण्यासंदर्भात संबंधीतांना वेळोवेळी सुचित केले होते. जिल्ह्यात रबीचे १ लाख ३६ हजार हेक्टर सरासरी क्षेत्र असतांना यंदा २ लाख १४ हजार हेक्टरवर रबीची पेरणी झाली आहे. त्यामुळे अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीतून हिरमुडलेल्या शेतकऱ्यांना यंदाचा रबी हंगाम समाधानकारक ठरेल, अशी अपेक्षा आहे़
हरभरा पेरणीक्षेत्रात वाढ; शेतकरी समाधानी
यंदा रबीसाठी जवळपास सर्वच प्रकल्पात मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध झाले आहे़ विष्णुपूरीसह येलदरी आणि इसापूर धरणातून सिंचनासाठी मुबलक पाणी उपलब्ध होईल, या अपेक्षेतून शेतकऱ्यांनी रबीतील गहू, हरभरा पेरणीत वाढ केली आहे़ ४जवळपास २५२ टक्के हरभरा पेरणी झाली आहे़ हरभऱ्याचे सर्वसाधारण क्षेत्र ६२३ हेक्टर असताना १५७१ हेक्टरवर पेरणी झाली आहे़ तर जवळपास ५७ टक्के क्षेत्रावर गव्हाची पेरणी झाली आहे़ थंडीत वाढ झाल्याने पिकपरिस्थतीही चांगली आहे़